बीड बायपासवर भीषण अपघात ; दोन ठार, दोन दिवसांत तीन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:21 IST2021-02-05T04:21:04+5:302021-02-05T04:21:04+5:30

औरंगाबाद: कामावर निघालेल्या दुचाकीस्वार दोन आते- मामेभाऊ तरुणांना भरधाव ट्रकने चिरडले. या भीषण अपघातात दोघे जण ठार झाले. ही ...

Horrific accident on Beed bypass; Two killed, three killed in two days | बीड बायपासवर भीषण अपघात ; दोन ठार, दोन दिवसांत तीन बळी

बीड बायपासवर भीषण अपघात ; दोन ठार, दोन दिवसांत तीन बळी

औरंगाबाद: कामावर निघालेल्या दुचाकीस्वार दोन आते- मामेभाऊ तरुणांना भरधाव ट्रकने चिरडले. या भीषण अपघातात दोघे जण ठार झाले. ही घटना बायपासवरील नाईकनगर कमानीजवळ बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर ट्रक सोडून चालक पळून गेला. संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करून केबीनच्या काचा फोडल्या. जमाव ट्रक पेटविण्याच्या तयारीत असताना पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ट्रक जप्त केला. मागील दोन दिवसांत बायपासवर अपघातात तीन बळी गेले आहेत.

सचिन कल्याण राठोड (वय ३०, रा. नाईकनगर, बायपास ) आणि नितेश कुंडलिक पवार (३२, रा. पोरगाव तांडा, ता. पैठण, ह. मु. शिवाजीनगर) अशी मयत तरुणांची नावे आहेत. दोघे नात्याने आते - मामेभाऊ होते आणि दोघेही जेसीबी ऑपरेटर (चालक) म्हणून कामाला होते. या अपघाताविषयी प्राप्त माहिती अशी की, सचिन आणि नितेश हे आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास नाईकनगरहून झाल्टाफाट्याकडे मोटारसायकलवरून जात होते. नाईकनगर कमानीसमोर ते रस्ता ओलांडून झाल्टाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आले. याचवेळी देवळाई चौकाकडून झाल्टा फाट्याकडे निघालेल्या मालवाहू ट्रकची दोघांना धडक बसली. या अपघातात सचिन आणि नितेश यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेले. दोघे गंभीर जखमी झाले आणि रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडले. या घटनेनंतर ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला. अपघातानंतर जखमी दोघे सुमारे पंधरा मिनिटे तिथेच पडून होते. प्रत्यक्षदर्शीनी या घटनेची माहिती पोलीस आणि रुग्णवाहिकेला कळविली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत मरण पावलेल्या तरुणांचे नातेवाईकही तेथे आले होते. नितेश आणि सचिन यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना घाटी रुग्णालयात नेण्यास सांगितले. अपघात विभागातील डॉक्टरांनी नितेश आणि सचिन यांना तपासून मयत घोषित केले. या अपघाताविषयी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

चौकट...

संतप्त नागरिकांची ट्रकवर दगडफेक

अपघातानंतर घटनास्थळी सचिन आणि नितेशला पडलेले पाहून संतप्त नागरिकांनी दोघांना चिरडणाऱ्या ट्रकवर दगडफेक करून नुकसान केले. यावेळी जमाव ट्रक पेटवून देण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याचवेळी पोलीस घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि त्यांनी जमावाला शांत केले. नितेश आणि सचिन यांना रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात पाठविले.

काही काळ वाहतूक कोंडी

अपघातानंतर देवळाई चौकाकडून झाल्टा फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद देशमुख आणि गस्तीवरील जवाहरनगर , पुंडलिकनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. पुंडलिकनगर पोलिसांनी ट्रक जप्त केला आणि मयताच्या मोटारसायकल घटनास्थळावरुन हलविली.

दोघेही विवाहित

मयत सचिन आणि नितेश हे विवाहित आहेत. नितेशला लहान भाऊ, दोन वर्षाचा मुलगा आहे. तर सचिन यास ७ वर्षीय मुलगी आणि ४ वर्षांचा मुलगा, दोन भाऊ आहेत.

Web Title: Horrific accident on Beed bypass; Two killed, three killed in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.