‘हॉरिझन- २०२०’मुळे संशोधनाच्या मोठ्या संधी
By Admin | Updated: October 11, 2014 00:39 IST2014-10-11T00:14:13+5:302014-10-11T00:39:16+5:30
औरंगाबाद : ‘हॉरिझन- २०२०’ हा प्रकल्प राबविण्यात येणार असून तब्बल ८० बिलियन युरो इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

‘हॉरिझन- २०२०’मुळे संशोधनाच्या मोठ्या संधी
औरंगाबाद : युरोपियन युनियनच्या माध्यमातून पुढील सात वर्षांत संशोधन व नावीन्यपूर्ण प्रकल्प यासाठी ‘हॉरिझन- २०२०’ हा प्रकल्प राबविण्यात येणार असून तब्बल ८० बिलियन युरो इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे या प्रकल्पात सहभागी होऊ इच्छिणारे भारतातील पहिले विद्यापीठ असून आम्ही यासाठी सर्वतोपरी सहकार्यास तयार आहोत, अशी ग्वाही युरोपियन विद्यापीठाचे प्रतिनिधी डॉ. कार्लोस मचॅडो ब्रुसलेस बेल्जियम यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व युरोपियन विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने संशोधन व नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक गुरुवार, दि.९ रोजी महात्मा फुले सभागृहात घेण्यात आली. यावेळी डॉ. कार्लोस मचॅडो, प्रा. मारिया जेझस लामेला (स्पेन), प्रा. व्हेजी लॉरेंजो (इटली) व प्रा. मोजेस जोसेफ (पोलंड) हे प्राध्यापक यावेळी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. बी.ए. चोपडे, तर व्यासपीठावर कुलसचिव डॉ. धनराज माने, बीसीयूडी संचालक डॉ. के.व्ही. काळे, डॉ. अनिल कुऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनपर भाषणात डॉ. मचॅडो म्हणाले की, सन २०१४ ते २०२० या दरम्यान युरोपियन विद्यापीठाच्या वतीने ‘हॉरिझन- २०२०’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत सर्व देशांत लोकांचा आर्थिक स्तर उंचावला असून नोकरी, संशोधनाच्या नवनवीन संधी निर्माण झालेल्या आहेत. भारतासारख्या विकसनशील देशातील प्राध्यापकांनी याचा लाभ घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले. प्रारंभी, कुलगुरू डॉ. चोपडे यांनी बीजभाषण व व्हिजन प्लॅन सादर केला. इंडियन सायन्स काँग्रेसच्या सहकार्याने डिसेंबरमध्ये विद्यापीठात राष्ट्रीय परिषद होणार असून त्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ७७ मोठे प्रकल्प पूर्ण झाले असून विद्यापीठात १३३ प्रकल्प सुरू आहेत, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन डॉ. चेतना सोनकांबळे यांनी केले.