जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
By Admin | Updated: July 10, 2014 01:03 IST2014-07-10T00:39:11+5:302014-07-10T01:03:35+5:30
जालना: जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
जालना: जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ज्या भागात पावसाने हजेरी लावली त्य परिसरात पेरणीसाठी लगबग सुरू झालेली आहे. तर अद्याप काही भागात पाऊस झालेला नसल्याने अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
जालना जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात कमी सरासरी ३२ मि. मी. पाऊस झालेला आहे. ८ जुलै रोजी झालेल्या पावसाची आकडीवारीनुसार जालना ८.३२ मि. मी., भोकरदन-०००, जाफराबाद-०००, बदनापूर- ३.४० मि. मी., परतूर १६ मि. मी., मंठा-४ मि. मी. घनसावंगी ५ मि. मी., अंबड- ७ मि. मी. पावसाची नोंद आहे. ८ जुलैरोजी सर्वाधिक पाऊस परतूर तालुक्यात पडला. आता पर्यंत सार्वाधिक पाऊस घनसावंगी तालुक्यात ४० मि.मी. पडल्याची नोंद आहे. सर्वात कमी बदनापूर तालुक्यात सरासरी १६ मि. मी पाऊस झाल्याची नोंद आहे. यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.
जिल्ह्यात अद्यापही सर्वदूर पाऊस झालेल्या नसल्याने अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्यांंची लगबग सुरू केल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
परतूर : तालुक्यात महिनाभरापासून पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र दि. ८ रोजी पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे.
पावसाळा सुरू होऊन महिना उलटला असला तरी पावसाचा पत्ता नव्हता पेरण्या खोळंबण्याबरोबरच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकरी हवालदिल होते. परंतु दि. ८ रोजी व यापूर्वी काही गावात पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शेतकऱ्यांनी कपाशी लागवड, सोयाबीनच्या पेरणीबरोबरच इतर खरिपाच्या पेरणीस प्रारंभ केला आहे. जमिनीतील ओल व पावसाही वातावरणााने शेतकरी पेरणीच्या कामाला लागल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. (वार्ताहर)
वरूड: जाफराबाद तालुक्यातील वरूड बू. परिसरातील शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाळा लागून महिना उलटला तरी अद्याप या भागात पाऊस झाला नसल्याने शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. मागील आठ दहा दिवसांपासून आभाळात ढग दाटून येते. पाऊस येईल असे वातावण निर्माण होते. मात्र पाऊस काही येत नाही. मृग व आर्द्रा नक्षत्र पावसासाठी नावाजले जातात. मात्र हे दोन्ही नक्षत्र कोरडे गेले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करून ठिबकवर कपासीचे पीक घेतले. मात्र आता विहीरीतील पाणी कमी होत असल्याने ही कपाशीही धोक्यात आली आहे. रविवार पासून लागलेल्या पूर्नवसू नक्षत्राकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहे. मात्र हे नक्षत्र लागून दोन दिवस झाले तरी अद्याप पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
केदारखेडा : परिसरात दोन दिवसांपूर्वी समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी पेरणीसह शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे.
महिनाभरापासून पावसाची प्रतीक्षा होती. रविवारी व सोमवार दोन दिवस पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी पेरणीच्या कामास लागला आहे. पावसाळा लागूनही एकही थेंब न पडल्याने शेतकरी धास्तावले होते. पेरणी पूर्व मशागत करुन पावसाची प्रतीक्षा करीत होते़ पावसाने विलंब केल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालेला होता़ रविवारी अचानक जोरदार पाऊस बरसला़ हा पाऊस पेरणी योग्य असल्याने सोमवारी शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीची लगबग सुरु केली. या पावसाने बळीराजा सुखावला आहे. गतवर्षी १० जुलै अखेर खरीप पिकांची वाढ जोमात होती. यंदा अद्यापही अनेक भागात पेरणी झालेली नाही. त्यामुळे यंदाही मोठा पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. (वार्ताहर)
दानापूर
भोकरदन तालुक्यातील दानापूर येथून जवळच असलेले देहेड येथील शेतकरी सांडू बावस्कर यांनी एक हेक्टर क्षेत्रात कपाशी मध्ये ठिबक सिंचनाद्वारे अंतर पीक म्हणून मेथीची लागवड केली आहे.
बावस्कर यांनी पारंपरिक पीक सांभाळून हा जोड व्यवसाय सुरु केला आहे. यामुळे चारपैसेही त्यांना मिळाल्याचे ते सांगतात. महिनाभरात मेथीची भाजी बाजारात विकली जाते. तुषार सिंचनाद्वारे कपाशीलाही या पाण्याचा फायदा होतो आणि मेथीच्या भाजीचे उत्पन्नही वाढत आहे.
मागील वर्षीपासून दानापूर येथील शिवाजी महाराज, रामू आगलावे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी यंदाही कपाशीमध्ये अंतर पीक म्हणून मेथीची लागवड केली आहे. अल्पावधीतच मेथीला चांगली मागणी आल्याने परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहे.