रेल्वेस्टेशनमध्ये गुंडांचा धुडगूस
By Admin | Updated: December 17, 2014 00:38 IST2014-12-17T00:31:18+5:302014-12-17T00:38:17+5:30
औरंगाबाद : वीस ते पंचवीस टवाळखोरांच्या एका टोळक्याने सोमवारी मध्यरात्री रेल्वेस्टेशनच्या आत असलेल्या फूड प्लाझामध्ये चांगलाच हैदोस घातला.

रेल्वेस्टेशनमध्ये गुंडांचा धुडगूस
औरंगाबाद : वीस ते पंचवीस टवाळखोरांच्या एका टोळक्याने सोमवारी मध्यरात्री रेल्वेस्टेशनच्या आत असलेल्या फूड प्लाझामध्ये चांगलाच हैदोस घातला. तेथे बसलेल्या ग्राहकांना शिवीगाळ करीत बाहेर पिटाळले. नंतर आतमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड करीत तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. विशेष म्हणजे या टोळक्याचा हा धुमाकूळ तब्बल दोन तास आणि तोही क्रांतीचौक आणि रेल्वे पोलिसांच्या डोळ्यांसमक्ष सुरू होता. हात हालविण्याच्या पुढे पोलिसांनी काही केले नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
रेल्वेस्टेशनच्या आत रेल्वे प्रशासनानेच प्रवाशांसाठी फूड प्लाझा सुरू केलेला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना जेवण, चहा, नाश्ताची येथे व्यवस्था आहे. रविवारी रात्री तीन तरुण या ठिकाणी खाण्यासाठी आले. खाण्यापिण्याचे त्यांचे अडीचशे रुपये बिल झाले. तेव्हा डिस्काऊंट द्या, असे म्हणत या तिघांनी त्यावेळी वाद घातला. नंतर अवघे दोनशे रुपये देत तिघे तेथून निघून गेले.
मोबाईल चोरीचे केले नाटक
त्याच रात्री तिघे अर्ध्या तासानंतर पुन्हा फूड प्लाझात आले आणि आमचा ५० हजार रुपयांचा मोबाईल येथून चोरी गेला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनीच तो चोरला, असे म्हणत गोंधळ घालण्यास त्यांनी सुरुवात केली. तेव्हा फूड प्लाझाचे ड्यूटी मॅनेजर वीरसिंग यांनी तात्काळ लोहमार्ग पोलिसांना बोलाविले. पोलिसांना पाहिल्यानंतर मात्र तिघांनी काढता पाय घेतला. तेव्हा हे प्रकरण मिटले, असे रेल्वे प्रशासनाला वाटले.
मारहाण करीत बाहेर काढले
मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास नित्याप्रमाणे फूड प्लाझाचे काम सुरू होते. आतमध्ये अनेक ग्राहक जेवण करीत बसलेले होते. रविवारी रात्री गोंधळ घालणारे ‘ते’ तीन तरुण आपल्या वीस ते पंचवीस साथीदारांसह फूड प्लाझात घुसले.