घरमालकासह वॉचमनविरुद्ध वर्षभरानंतर खुनाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:20 IST2017-08-11T00:20:24+5:302017-08-11T00:20:24+5:30
जुनी इमारत पाडून बिल्ंिडग मटेरियल उचलण्याच्या कारणावरून ठेकेदाराचा खून केल्याप्रकरणी घरमालक आणि वॉचमनविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात तब्बल सव्वावर्षानंतर हत्या आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला.

घरमालकासह वॉचमनविरुद्ध वर्षभरानंतर खुनाचा गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जुनी इमारत पाडून बिल्ंिडग मटेरियल उचलण्याच्या कारणावरून ठेकेदाराचा खून केल्याप्रकरणी घरमालक आणि वॉचमनविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात तब्बल सव्वावर्षानंतर हत्या आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
घरमालक भास्कर क ोल्हे आणि वॉचमन संजय बागूल अशी संशयित आरोपींची नावे आहेत. छावणी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर मुंढे यांनी सांगितले की, २३ मे २०१६ रोजी जालिंदर त्रिभुवन यांचा मृतदेह छावणीतील लष्कराच्या एरियात सापडला होता. तत्पूर्वी २० मेपासून ते बेपत्ता होते. पती हरवल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पोलिसांत नोंदविली होती. दरम्यान, तीन दिवसांनी त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर छावणी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून शवविच्छेदन केले. त्यांचा व्हिसेरा न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविला होता. न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून अंतिम अहवाल नुकताच छावणी पोलिसांना प्राप्त झाला. घाटीतील शवविच्छेदन करणारे डॉक्टर आणि प्रयोगशाळेच्या अहवालानुसार मृताचा खून झाल्याचे समोर आले. ही बाब मृताच्या नातेवाईकांना कळवून त्यांचे काही म्हणणे असल्याचे नोंदविण्यास सांगितले होते. तेव्हा मृताची पत्नी विजयमाला त्रिभुवन (रा. कबीरनगर, उस्मानपुरा) यांनी याविषयी छावणी पोलीस ठाण्यात ९ आॅगस्ट २०१७ रोजी खुनाची तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीनुसार आरोपी भास्कर क ोल्हे याच्या मालकीची मिटमिटा परिसरातील इमारत पाडण्याचे आणि तेथील मटेरियल उचलण्याचे कंत्राट मृत जालिंदर यांना त्यांनी तीन लाख रुपयांत दिले होते. ठरल्यानुसार जालिंदर यांनी इमारत पाडण्यास सुरुवात केली. इमारतीचे मटेरियल उचलण्यासाठी जालिंदर तेथे गेले असता मटेरियल उचलण्यास कोल्हे यांनी मज्जाव केला. कोल्हे यांनी त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून धमकावले आणि आणखी एक लाख रुपयांची मागणी केल्याचे नमूद केले. तसेच वॉचमन बागूल यानेही त्यांना धमकावले होते. त्यानंतर २० मेपासून जालिंदर बेपत्ता झाला आणि २३ रोजी त्याचा मृतदेह आढळला. आरोपींनी त्यांच्या डोक्यात काहीतरी मारून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत छावणीतील मोकळ्या मैदानात असलेल्या लिंबाच्या झाडाखाली आणून टाकले असावे, असे तक्रारीत नमूद केले. या तक्रारीनुसार छावणी ठाण्यात खून आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला.