नियम डावलून वाढविली घरपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:00 IST2017-09-01T00:00:02+5:302017-09-01T00:00:02+5:30
शासनाच्या नियमांना डावलून महापालिकेने घरपट्टीत वाढ केली असून, अवास्तव घरपट्टी नागरिकांवर लादल्याने संताप व्यक्त होत आहे. वाढीव घरपट्टीच्या नोटिसा दिल्यानंतर मागील एक महिन्यापासून शहरातील नागरिक हवालदिल झाले आहेत.

नियम डावलून वाढविली घरपट्टी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शासनाच्या नियमांना डावलून महापालिकेने घरपट्टीत वाढ केली असून, अवास्तव घरपट्टी नागरिकांवर लादल्याने संताप व्यक्त होत आहे. वाढीव घरपट्टीच्या नोटिसा दिल्यानंतर मागील एक महिन्यापासून शहरातील नागरिक हवालदिल झाले आहेत.
ठराविक कालावधीनंतर शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करुन पुनमूर्ल्यांकन करणे अपेक्षित असताना परभणी महापालिकेने तब्बल १७ वर्षानंतर मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले आहे. हे मूल्यांकन करीत असताना ंअनेक मालमत्ताधारकांना ११ पट घरपट्टी दिली आहे. त्यामुळे ज्यांना पूर्वी १०० रुपये घरपट्टी होती, त्यास १ हजार रुपयांपर्यंत घरपट्टी दिली जात आहे. या अवाढव्य घरपट्टीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. शासनाच्या नगरविकास विभागाच्या १६ सप्टेंबर २००० च्या परिपत्रकानुसार पुनर्मूल्यांकन करीत असताना होणारी करवाढ ही कर मूल्याच्या अर्ध्या पटीपेक्षा जास्त राहणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे जर चार वर्षांनी कर मूल्यांकन होत असेल तर मूल्याच्या दीड पटीपेक्षा अधिक मूल्य जाणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. याचाच अर्थ कर वाढवित असताना १०० रुपये कर असेल तर सुधारित कर १५० रुपयांपेक्षा अधिक असता कामा नये, असे शासनाचे परिपत्रक आहे. मात्र महापालिकेने ११ पट कर वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या माथी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कराचा बोझा टाकण्यात आला आहे. मनपाने केलेल्या मालमत्ता कराच्या वाढीला सर्वच स्तरातून जोरदार विरोध होत असून, याबाबतचे आक्षेप दाखल करणाºयांची संख्याही मोठी आहे. कुठल्याही सुविधा नसताना किंवा सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न होत नसताना मालमत्ता कर मात्र भरमसाठ वाढविण्यात आला आहे. याबाबत सत्ताधारी काँग्रेस पक्षाने चुप्पी साधली असून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरू केले आहे.