होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस नको
By Admin | Updated: December 9, 2014 01:01 IST2014-12-09T00:45:49+5:302014-12-09T01:01:18+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियमामध्ये सुधारणा करून होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस नको
औरंगाबाद : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियमामध्ये सुधारणा करून होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. न्यायालयाने प्रतिवादींना नोटिसा काढून याचिकेची सुनावणी ९ जानेवारी रोजी ठेवली.
महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसाय अधिनियम १९५९ (बॉम्बे होमिओपॅथी प्रॅक्टिस अॅक्ट, १९५९) च्या कलम २० मध्ये आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम १९६५ कलम २, १० व अनुसूचीत सुधारणा करून होमिओपॅथी डॉक्टरांना फार्माकॉलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे आधुनिक औषध वैद्यकशास्त्राचे ज्ञान नसतानाही त्यांना ते वापरण्याचे अधिकार दिले आहेत. मान्यताप्राप्त शैक्षणिक अर्हता नसतानाही त्यांना वैद्यकीय उपचार करण्याची परवानगी मिळाली आहे. त्याचे दुष्परिणाम सामान्य लोकांवर होतील. त्यामुळे शासनाने केलेल्या दुरुस्तीला या याचिकेत विरोध करण्यात आला आहे. न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती ए. एम. बदर यांच्यासमोर याचिका सुनावणीसाठी आली असता न्यायालयाने प्रतिवादी महाराष्ट्र सरकारला नोटीस काढली आहे. याचिकाकर्त्यांकडून अॅड. आर. पी. भूमकर, अॅड. विश्वनाथ भूमकर हे काम पाहत आहेत. औरंगाबाद प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप बेंजरगे म्हणाले की, असोसिएशनचे सचिव डॉ. अविनाश देशपांडे यांनी ही याचिका दाखल केली.