गृहमंत्र्यांनी सुचविले ‘पिंक स्कॉर्ड’ नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:18 IST2021-02-05T04:18:52+5:302021-02-05T04:18:52+5:30

औरंगाबाद : ग्रामीण पोलीस विभागातील ४० महिलांकडे पहिल्यांदाच बीट अंमलदारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. महिलांना समसमान संधी देण्याचा हा सोहळा ...

The Home Minister suggested the name 'Pink Scord' | गृहमंत्र्यांनी सुचविले ‘पिंक स्कॉर्ड’ नाव

गृहमंत्र्यांनी सुचविले ‘पिंक स्कॉर्ड’ नाव

औरंगाबाद : ग्रामीण पोलीस विभागातील ४० महिलांकडे पहिल्यांदाच बीट अंमलदारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. महिलांना समसमान संधी देण्याचा हा सोहळा अविस्मरणीय ठरला. महिला बीट अंमलदारच्या पथकाला ‘पिंक स्कॉर्ड’ (गुलाबी पथक) असे नाव द्या, आणि त्यांना देण्यात येणाऱ्या बाइकचा रंगही गुलाबी ठेवा, अशी सूचना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या. टाळ्या वाजवून या कल्पनेचे उपस्थितांनी स्वागत केले.

गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने औरंगाबाद ग्रामीण महिला बीट अंमलदार यांच्याशी परिसंवाद व आढावा बैठकीचे शुक्रवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. औरंगाबाद ग्रामीण भागात पहिल्यांदाच महिला बीट अंमलदार या पदाची सूत्रे ४० महिलांवर सोपविण्यात आली. त्यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार झाला. या सोहळ्याचे साक्षीदार ठरले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी (नांदेड), आ. विक्रम काळे, आ. अमोल मिटकरी.

यावेळी गृहमंत्री देशमुख म्हणाले की, बीट अंमलदार हा एक्झिक्युटिव्ह जॉब महिलांना देत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे. कोविड व लॉकडाऊन काळात पोलीस विभागाला अतिरिक्त काम करावे लागले, कोरोना आटोक्यात आणण्यात जसे आरोग्य विभाग व अन्य विभागाने काम केले तसेच पोलीस विभागाचे मोठे सहकार्य लाभल्याचे सांगत त्यांनी पोलिसांचे कौतुक केले.

प्रास्ताविकेत पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितले की, महिलांना संधीची समानता देण्यासाठी बीट अंमलदाराची जबाबदारी ४० महिलांना देण्यात आली आहे. यामुळे विभागातील पुरुषांवरील कामाचा ताण कमी होईल. हा नारीशक्तीचा सन्मान असल्याचा उल्लेख त्यांनी केला. तसेच ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

चौकट

मोक्षदा पाटील यांचा सत्कार

राष्ट्रीय महिला आयोगाने ‘कोविड वुमन वॉरियर्स’ पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विशेष सत्कार केला.

Web Title: The Home Minister suggested the name 'Pink Scord'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.