पंच्याहत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठांना आता घरपोच आरोग्यसेवा !

By Admin | Updated: March 26, 2016 00:52 IST2016-03-26T00:47:46+5:302016-03-26T00:52:06+5:30

उस्मानाबाद : वयोवृद्धांना दवाखान्यात जाण्यासाठी प्रचंड गैरसोयीला तोंड द्यावे लागते. त्यांची होणारी फरफट लक्षात घेवून जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून

Home-based healthcare for senior citizens who have crossed the Pankahatarai! | पंच्याहत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठांना आता घरपोच आरोग्यसेवा !

पंच्याहत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठांना आता घरपोच आरोग्यसेवा !


उस्मानाबाद : वयोवृद्धांना दवाखान्यात जाण्यासाठी प्रचंड गैरसोयीला तोंड द्यावे लागते. त्यांची होणारी फरफट लक्षात घेवून जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून आता पंच्याहत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठांना घरपोच आरोग्यसेवा दिली जाणार आहे. आरोग्य विभागचा हा उपक्रम वयोवृद्धांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आजवर वेगवेगळे उपक्रम राबवून राज्यात वेगळा ठसा उमठविला आहे. उपलब्ध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मेळ साधून आरोग्यसेवा अधिक गतीमान केली आहे. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वर्षाकाठी चार ते पाच प्रसुती होत नसत. त्या ठिकाणी आज महिन्याकाठी १५ ते २० प्रसुती होवू लागल्या आहेत. तसेच रूग्णांची संख्याही वाढू लागली आहे.
एकेका आरोग्य केंद्राची ‘ओपीडी’ पूर्वीच्या तुलनेत दप्पट झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्यासोबतच चारा टंचाईही निर्माण झाली आहे. त्यामुळे छावण्यांच्या माध्यमातून पशुधन जगविले जात आहे. अशा छावण्यांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे राबवून पशुपालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यकतेनुसार औषधोपचार व शस्त्रक्रियाही करण्यात येत आहेत. असे असतानाच आता ज्येष्ठांसाठीही आरोग्य विभागाने उपक्रम हाती घेतला आहे. नियमित तपासण्या तसेच उपचारासाठी त्यांना रूग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही. ज्यांनी वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेली असेल, त्यांना घरपोच आरोग्यसेवा दिली जाणार आहे.
हा उपक्रम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. वयोवृद्धांसाठी हा उपक्रम दिलासादायक ठरणार आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गावागावातील पंच्याहत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणातून समोर आलेल्या वयोवृद्धांना नजीकच्या आरोग्य केंद्रातील कर्मचारी सेवा देणार आहेत. प्रत्येक महिन्यातून एक दिवस संबंधित ज्येष्ठांची आरोग्य तपासणी केली जाईल. त्यानंतर त्यांना आवश्यक असलेले सर्व उपचार तसेच औषधीही दिली जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सर्वसामान्यांच्या हितासाठी आजवर वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्याचाच हा एक भाग आहे. अनेक ज्येष्ठ नागरीक दवाखान्यात जावू शकत नाहीत. अशा ज्येष्ठांना आता घरपोच सेवा दिली जाणार आहे. तसेच शंभरी ओलांडलेल्या नागरिकांचा १ मे रोजी ग्रामसभेत सत्कार केला जाणार आहे, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Home-based healthcare for senior citizens who have crossed the Pankahatarai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.