समृद्धीच्या दरपत्रकाची कृती समितीकडून होळी
By Admin | Updated: July 3, 2017 23:52 IST2017-07-03T23:50:35+5:302017-07-03T23:52:11+5:30
जालना :शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप करत शेतकरी बचाव कृती समिती व शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समृद्धी महामार्गाच्या दरपत्रकाची होळी केली.

समृद्धीच्या दरपत्रकाची कृती समितीकडून होळी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गाच्या जमिनीसाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करून संमतीपत्र भरून घेतले. ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप करत शेतकरी बचाव कृती समिती व शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समृद्धी महामार्गाच्या दरपत्रकाची होळी केली.
जालना व बदनापूर तालुक्यातील २५ गावांमधील ५१२ हेक्टर जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे. संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या संयुक्त मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. जिल्हास्तरीय समितीने थेट खरेदीसाठी गावनिहाय जमिनीचे दर जाहीर करून ५१२ शेतकऱ्यांचे संमतीपत्र भरून घेतले आहे. मात्र, यास शेतकरी हक्क बचाव समितीकडून विरोध केला जात आहे. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृहात सोमवारी बाधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली.
रस्ते विकास महामंडळाने शेतकऱ्यांकडून संमतीपत्र भरून घेण्यासाठी कंत्राटी पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत. पर्यवेक्षकांनी हे केवळ थेट वाटाघाटीचे निमंत्रण असल्याचे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली. संमतीपत्रावर स्वाक्षऱ्या न केल्यास पोलीस संरक्षणात तुमच्या जमिनीवर ताबा केला जाईल, अशा धमक्या देऊन संमतीपत्रावर स्वाक्षऱ्या घेतल्या, असा आरोप कृती समितीने बैठकीत केला.
त्यानंतर बाधित शेतकरी व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयसमोर निदर्शने करत समृद्धी महामार्गाच्या दर पत्रकाची होळी केली.