खरिपाच्या विम्यासाठी प्रमाणपत्रांची आडकाठी
By Admin | Updated: August 12, 2014 02:00 IST2014-08-12T01:25:00+5:302014-08-12T02:00:00+5:30
हिंगोली : सुरूवातीला माहिती आणि आता प्रमाणपत्रांअभावी खरीप हंगामाच्या पीक विम्याला मुकावे लागण्याची वेळ उत्पादकांवर ओढवली.

खरिपाच्या विम्यासाठी प्रमाणपत्रांची आडकाठी
हिंगोली : सुरूवातीला माहिती आणि आता प्रमाणपत्रांअभावी खरीप हंगामाच्या पीक विम्याला मुकावे लागण्याची वेळ उत्पादकांवर ओढवली. दुसऱ्यांदा १६ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली तरी ३१ जुलैैनंतर पेरणी झालेल्याच उत्पादकांना विमा काढता येणार आहे; परंतु पेरण्या आधिच आटोपल्याने महसूल व कृषीच्या कर्मचाऱ्यांकडून आॅगस्टमधील पेरणीचे प्रमाणत्र दिले जात नाही अन् प्रमाणपत्रांअभावी बँकेत विमा काढता येत नाही. परिणामी, प्रमाणपत्रांची आडकाठी शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवत आहे.
खरीप हंगामाच्या पीक विम्याची मुदत ३१ जुलै रोजी संपली होती; पण बहुतांश उत्पादकांना या मुदतीपूर्वी विम्याची माहिती मिळाली नाही. परिणामी, ५६ टक्के उत्पादक विम्यापासून वंचित होते. म्हणून शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर १६ आॅगस्टपर्यंत मुदत वाढविण्यात आली. मात्र त्यात ३१ जुलैैनंतर झालेल्या पेरणीच्या प्रमाणपत्रांची अट घालण्यात आली.
महसूलचे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकाने दिलेल्या प्रमाणपत्राची खातरजमा करूनच पीक विमा स्वीकरण्याचे आदेश बँकेच्या शाखाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांकडून ३१ जुलैैपूर्वी झालेल्या पेरणीचे प्रमाणपत्र स्वीकारल्या जात नसल्याने उत्पादकांची अडचण झाली. परिणामी, बहुतांश उत्पादकांना विमा काढण्याची इच्छा असतानाही सातबारा मिळत नाहीत. वंचित उत्पादकांची संख्या मोठी असल्याने अशा दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा फटका बसत आहे. (प्रतिनिधी)