सव्वा लाखाच्या बिलासाठी मृतदेह धरला रोखून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 09:18 AM2021-05-25T09:18:56+5:302021-05-25T09:19:29+5:30

सव्वा लाखाचे बिल भरण्यावरून कोविड रुग्णाचा मृतदेह सुमारे साडेपाच तास रोखून ठेवल्याची खळबळजनक घटना सोमवारी बजाजनगरातील ममता हॉस्पिटलमध्ये घडली.

Holding the corpse for a bill of Rs. 1.25 lacks | सव्वा लाखाच्या बिलासाठी मृतदेह धरला रोखून

सव्वा लाखाच्या बिलासाठी मृतदेह धरला रोखून

googlenewsNext

औरंगाबाद : सव्वा लाखाचे बिल भरण्यावरून कोविड रुग्णाचा मृतदेह सुमारे साडेपाच तास रोखून ठेवल्याची खळबळजनक घटना सोमवारी बजाजनगरातील ममता हॉस्पिटलमध्ये घडली. सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. 

सिडको वाळूज महानगरातील एका ४९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना ३ मे रोजी बजाजनगरातील ममता मेमोरियल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. त्यावेळी नातेवाईकांकडून तत्काळ १ लाख रुपये अनामत रक्कम घेण्यात आली होती. याशिवाय, दररोज औषधांच्या खर्चापोटी जवळपास अडीच ते तीन लाख रुपये रुग्णाच्या नातेवाईकांकडून वसूल करण्यात आले. दरम्यान, सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तुमच्या रुग्णाचे निधन झाले असून उपचाराचे १ लाख १९ हजार रुपये भरा, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. उर्वरित बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने मृताच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांकडे विनवण्या करून अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ताब्यात देण्याची विनंती केली. मात्र, रुग्णालयाचे बिल भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नाही, असा पवित्रा या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी घेतला.  

डॉक्टरांनी केले हात वर
बिलासाठी मृतदेह रोखून धरल्याची माहिती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मिळाल्यानंतर ममता हॉस्पिटलचे डॉ. सुदाम चव्हाण यांनी बिलासाठी मृतदेह रोखून धरला नसल्याची सारवासारव केली.  

पोलिसांची मध्यस्थी 
या प्रकाराची माहिती मिळताच वडगाव-बजाजनगरचे सरपंच सचिन गरड, भगवान ढेरंगे, भाऊसाहेब पवार, उपनिरीक्षक प्रीती फड, पोलीस हेडकाॅन्स्टेबप रामदास गाडेकर आदींनी मृताचे नातेवाईक व डॉक्टरांशी चर्चा केली. नातेवाईक आक्रमक झाल्याने व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही हजर झाल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. 

Web Title: Holding the corpse for a bill of Rs. 1.25 lacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.