वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तीन दिवसांपासून धरणे
By Admin | Updated: July 4, 2014 00:15 IST2014-07-03T23:43:38+5:302014-07-04T00:15:41+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यातील प्राथमिक व ग्रामीण रूग्णालयातील तसेच उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे दिले

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तीन दिवसांपासून धरणे
लातूर : लातूर जिल्ह्यातील प्राथमिक व ग्रामीण रूग्णालयातील तसेच उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे दिले असून, विविध मागण्यांसाठी त्यांनी आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे ग्रामीण रूग्णांचे हाल सुरू झाले आहेत़ अनेक रूग्णांना डॉक्टर नसल्यामुळे सेवा मिळाली नाही. त्यामुळे रूग्णांना खाजगी रूग्णालयाचा आधार घ्यावा लागला.
जिल्ह्यातील प्राथमिक, ग्रामीण तसेच उपजिल्हा रूग्णालयातील ८० वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यामुळे आरोग्य यंत्रणा हातबल झाली आहे. दरम्यान, रूग्णांचे हाल होऊ नये म्हणून कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर काम भागविण्याचा प्रयत्न केला. पण रूण्णांची गैरसोय सुरू झाली आहे़ बाह्य रूग्ण विभाग, शवविच्छेदन, एमएलसी, कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया, आपतकालीन रूग्णसेवेवर परिणाम झाला. डॉक्टर्स डे निमित्त पुकारलेल्या या आंदोलनात वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. प्रलंबित मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत धरणे आंदोलन चालू राहणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास दिलेले राजीनामे परत न घेता शासकीय सेवेत न येण्याचा निर्धार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आंदोलनात महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेच्या अध्यक्ष डॉ. सगिरा पठाण, कार्याध्यक्ष डॉ. राम पवार, सचिव डॉ. संतोष हिंडोळे, डॉ. सचिन बालकुंदे, डॉ. ज्ञानेश्वर कदम,डॉ राहूल आनेराव, डॉ. परमेश्वर हिरास, डॉ. एस. के. शिंदे, डॉ. आर. आर. शेख, डॉ. शशिकांत डांगे, डॉ़ एम़बीक़ुलकर्णी, डॉ. पी. एस. कापसे, डॉ़ ए़सी़ लोंढे, डॉ़ श्रीनिवास कदम, डॉ़ रेड्डी, डॉ़ आनंद कलमे, डॉ़ उज्वला साळुंके आदी सहभागी झाले होते.
रूग्णांची गैरसोय़़़
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपामुळे ग्रामीण रूग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू झाले आहेत़ निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील प्राथमिक रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आलेला एक मृतदेह डॉक्टरांच्या संपामुळे मंगळवारी लातूरला आणण्यात आले़ शिवाय, किरकोळ आजारांवर उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची गैरसोय वाढली आहे़