हायटेक मोबाईल मटका राजरोस !

By Admin | Updated: May 23, 2015 00:40 IST2015-05-23T00:33:08+5:302015-05-23T00:40:12+5:30

दत्ता थोरे / हणमंत गायकवाड / पंकज जैस्वाल / सितम सोनवणे लातूर : जिल्ह्यात मटका कुठेच खेळला जात नाही, अशी आवई पोलिसांकडून उठविली जात असली, तरी ‘लोकमत’च्या चमूने

HiTech Mobile Matt Rajros! | हायटेक मोबाईल मटका राजरोस !

हायटेक मोबाईल मटका राजरोस !



दत्ता थोरे / हणमंत गायकवाड / पंकज जैस्वाल / सितम सोनवणे
लातूर : जिल्ह्यात मटका कुठेच खेळला जात नाही, अशी आवई पोलिसांकडून उठविली जात असली, तरी ‘लोकमत’च्या चमूने जिल्हाभरात ठिकठिकाणी डमी ग्राहकांद्वारे प्रतिकात्मक मटका लावून केलेल्या स्टींगमुळे मटक्याचे बिंग फुटले आहे. पूर्वी चिठ्ठीवर खेळला जाणाऱ्या मटक्याचे सध्या तुरळक प्रमाण आहे. मोबाईल, व्हॉटस् अ‍ॅप या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मटकाही आता हायटेक झाला आहे. केवळ विश्वासातील व्यक्तींमध्येच खेळल्या जाणाऱ्या या मटक्याची दररोजची लाखो रुपयांची उलाढाल आहे.
‘लोकमत चमू’ने शुक्रवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रतिकात्मक पद्धतीने इतरांकडून मटका लावून घेतला. लातूर शहरातील आझाद चौक, सोलापुरे गल्ली, विक्रम नगर, नांदेड नाका, गांधी मार्केट, रिंग रोड परिसरात डमी ग्राहकांद्वारे मटका लावला. त्यावेळी मटक्याचे आकडे घेणाऱ्या व्यक्तींनी मोबाईलवर सांकेतिक पद्धतीने नंबर घेतले. त्याचा लघुसंदेश मटका बुकींकडे पाठविला. दुपारी कल्याण नावाच्या मटक्यावर घेतलेल्या आकड्यांचा निकाल सायंकाळी ६ वाजता कळू शकेल, असेही त्यांनी सांगितले. केवळ ओळखीच्याच लोकांच्या माध्यमातून मटका खेळविला जात असल्याचे दिसून येत आहे. अनोळखी व्यक्तींना थारा दिला जात नाही. कोणताही लेखी पुरावा बाळगला जात नाही. केवळ त्या व्यक्तीसमोर झालेले मोबाईलवरील बोलणे आणि विश्वासार्हतेवर मटका सुरू आहे. मोबाईलवरच मटकाबहाद्दरांचे लागेबांधे सुरू असून, त्याचा छडा लावण्यासाठी पोलीस मात्र अपयशी ठरत आहेत.
मटक्याचा खेळ आकड्यांवर आधारित असतो. दिवसभरात वेगवेगळ्या वेळेत मुंबई, कल्याण नावाचा मटका खेळविला जातो. ओपन नंबर कोणता लावायचा, यासाठी आकड्यांचा मेळ घालण्यात व्यस्त असलेले मटकाबहाद्दर जेवणाची भ्रांत विसरतात. सकाळपासून दुपारी ३ वाजेपर्यंत ‘ओपन’ लावण्यासाठी आकडेमोड करण्यात ते व्यस्त असतात. त्याचा निकाल ४.१० वाजता येतो. त्यानंतर ‘क्लोज’ लावण्यासाठी त्यांची व्यस्तता कायम असते. त्यामुळे ‘ओपन जेऊ देईना, क्लोज झोपू देईना...’ अशी मटक्यात व्यसनाधीन झालेल्यांची अवस्था आहे.
औसा तालुक्यातील ग्रामीण भागात मटक्याचे जाळे घट्ट असून, दररोज सुमारे दोन ते तीन लाखांची उलाढाल होत आहे. पोलिस दप्तरी जरी मटका बंद असला, तरी औशात मोबाईल मटका जोरात आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात चिठ्ठीवरील मटक्याची जागा मोबाईलने घेतली आहे. त्यामुळे मटका नागरिकांना दिसत नाही अन् पोलिसांना आढळत नाही, अशी अवस्था आहे.
औसा तालुक्यात औसा, किल्लारी व भादा या तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत राजरोस मटका सुरू आहे. मटका खेळणारे लोक अगोदर या बुकींकडे अ‍ॅडव्हान्स पैसे जमा करतात आणि त्यानंतर जसा आकडा लावायचा आहे, तसा तो मोबाईलवरच सांगतात. त्यामुळे मटका घेणारे बुकी आणि खेळणारे मटका बहाद्दर पोलिसांना सापडत नाहीत. याबाबत पोलीस ठाण्यांकडे विचारणा केली असता मटका बंद असल्याचे सांगण्यात आले. परंतु, औसा तालुक्यात मटका सुरू असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
लातूर जिल्ह्यातील मटका व्यवसायात आता मागच्या पिढीऐवजी पुढच्या पिढीची चलती आहे. पोलिस ठाण्यांचे ठाणेदार बदलले तसे मटक्याचे किल्लेदार बदलले आहेत. पूर्वी लातूरच्या व्यवसायात मटका लावणाऱ्यांसाठी ‘मी बाबुराव बोलतोय’ हे लोकगीत खुपच प्रसिध्द होते. अती प्रदूषणामुळे पोलिसांनी नाड्या आवळल्याने मटक्यात अडकलेल्या प्रतिष्ठीत गुरुजींनी शाळा करुन नवे गाव केल्याची चर्चा आहे.
काही ‘चिकट्या’ लोकांनी हा धंदा सोडण्याचे धारिष्ट्य केले पण अनेकांना अजूनही सोडवित नाही. हे काम एका - दोघाचे नाही तर अनेक रथी-महारथी ‘महा‘जन’ या धंद्यात चांगले स्थिरावले आहेत. रणांगणात न जाता धृतराष्ट्राला महाभारतातील दृष्टीने लाईव्ह युध्द सांगणारे नवे ‘संजय’ या व्यवसायात अवतरल्याने मटका खेळणाऱ्यांसाठी नवे ‘कवाड’ उघडले आहे. ‘शिवा’ सारख्या गाजलेल्या चित्रपटातील हिरोगिरी मटक्यात गर्जते आहे. ‘स्वामी’ तिन्ही जगाचा मटक्याविना होता भिकारी... मात्र आता नंबर वन शिकारी’ हे नवे गाणे नवख्या ‘सोमनाथा’ला ‘कालिदासा’चरणी सुचते आहे. ‘ब‘शिर’ सलामत तो मटका हजारका..’ हा डायलॉग लातूरच्या मटका व्यवसात क्रिकेटमधील ‘इरफान’ पठाणच्या चेंडूहून जास्त लोकप्रिय आहे. कुठे ‘पिल्लू’... कुठे ‘टिल्लू’.. असा मटक्याचा खेळ दूरचित्रवाणीवरील ‘अकबर’-बिरबल’ मालिकेसम लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
पोलिसांची नजर चुकवून जिल्ह्यातील बुकीधारक कल्याण, मुंबई नावाचा मटका चालवीत आहेत. या मटक्यातून दिवसाला दोन लाखांची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. चिठ्ठ्यांऐवजी मोबाईल मेसेज तसेच व्हॉटस् अ‍ॅपवर मटका घेतला जातो. दीड-दोन वर्षांपूर्वी दिवसाला २५ लाखांची उलाढाल मटक्यातून होत होती. मात्र गेल्या वर्षभरापासून ती कमी झाली असून, दोन लाखांवर आली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. अतिशय गोपनीय पद्धतीने मटक्याचा धंदा जिल्ह्यात चालूच आहे.
लातूर शहरात मटक्याचा डॉन असल्याचे बहुचर्चित होते. मात्र या वर्षभरात पोलिसांनी त्याच्या मुसक्या अनेकदा बांधल्या. त्यामुळे डॉनचे वर्चस्व कमी झाल्याचे बोलले जाते. तरीही या डॉनचा मुळ व्यवसाय मटका असल्याने समर्थकांमार्फत चालविला जातो. दरम्यान, लातूर शहरातील प्रकाश नगर ही मटक्याची राजधानी असल्याचे बोलले जाते. या राजधानीतच ‘डॉन’चे वास्तव्य आहे. विरळ ठिकाणी मटक्याचे आकडे खेळणाऱ्यांकडून घेतले जातात. लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, औराद शहाजानी, निलंगा, कासारशिरसी आदी ठिकाणी या बुकीधारकांचे मुख्यालय आहे. पोलिसांकडून मटक्याबाबत गेल्या वर्षभरापासून कारवाया होत असल्यामुळे विरळ ठिकाणी या बुकीधारकांचा व्यवसाय सुरू आहे.
लातूर जिल्ह्यात सुमारे ३० ते ४० मटका बुकी आहेत. तर त्यांचे शेकडो एजंट सक्रिय आहेत.
लातूर शहरात ‘लोकमत’च्या दोघा प्रतिनिधींनी डमी ग्राहक सोबत घेऊन मटका खेळणाऱ्या व्यक्तीकडे संपर्क साधला. तेव्हा मटका एजंट आणि प्रतिनिधींमध्ये झालेला संवाद...
प्रतिनिधी : मला मटका लावायचा आहे़
व्यक्ती : काय लावणार सुटा की जोड?
प्रतिनिधी : सुटा काय असतंय?
व्यक्ती : कल्याण, मुुंबई जोरात आहे़ गुरुजीचा मटका जरा कमी झालाय़ एक्का, दुर्री, तिर्री, चौव्या असे एक आकडे म्हणजे सुटा. दोन आकडे म्हणजे जोड असते़ ‘जॅकपॉट’, ‘संगम’ पण खेळता येईल. तुम्ही नवखे आहात. हळूहळू सर्व कळेल. तुम्ही तुर्तास ३५८७१२०=६३ जोड खेळा, असे गांधी मार्केट भागातील एकाने सांगितले. ‘सुटा’ मध्ये एका रूपायला ९ रूपये आहेत़ जोडला एका रूपयाला ९० रूपये मिळतील. ‘जॅकपॉट’ लागला तर एका रुपयाला हजार रुपये तुम्हाला मिळतील. ‘संगम’ लागला तर नशिबच खुललं. ‘संगम’च्या एका रुपयाला १२ हजार रूपये मिळतात. तुम्ही ठरवा, तोपर्यंत मी फोनवर बघतो.
प्रतिनिधी : तुम्हीच मला जरा मदत करा ना, आकडे मोड माहीत नाही़ मी पैसे देतो, तुम्ही जोड लावा़
व्यक्ती : (आकडे मोड करून) फोन लागत नाही़ नांदेड नाक्याचे बंद आहे़ गांधी मार्केट परिसरात एक बुकी आहे़ तुम्हाला लांबच थांबावे लागेल, असे सांगून त्याने गांधी मार्केट परिसराच्या उद्यानापलीकडे प्रतिनिधीला थांबवून दहा मिनिटांत मटक्याची चिठ्ठी घेऊन येतो म्हणून तो व्यक्ती गेला़ (व्यक्ती परत आल्यानंतर पुन्हा संवाद)
प्रतिनिधी : बराच वेळ लागला़
व्यक्ती : फोन करून त्याला बोलवावे लागते़ तुम्ही सांगितलेले कल्याण ७२ आकड्याला ४० रूपये, ७७ ला १० रूपये, २७ ला २० रूपये, २२ ला १० असे ८० रूपयांचा मटका लावला आहे़ पहिला आकडा ४ वाजून १० मिनिटाला कळेल. तर दुसरा आकडा संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटाला कळेल. सहा वाजेनंतर फोन करा. तुम्हाला आलेला आकडा सांगतो़, असे सांगून मटक्याचे आकडे लिहिलेली ती चिठ्ठी एजंटाने प्रतिनिधीच्या हातात दिली़
प्रतिनिधी : सायंकाळी ६.३० वाजता फोन केल्यानंतर, कोणती जोड आली आहे.
व्यक्ती : साहेब फेल गेला आपला आकडा़ जोड २० आली आहे़ सुटा आकडा दुर्री होता. तर क्लोज झिरो आली. त्यानंतर डमी ग्राहकासोबतही बोलणे झाले.

Web Title: HiTech Mobile Matt Rajros!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.