प्रदर्शनातून उलगडला वृत्तपत्रांचा इतिहास
By Admin | Updated: December 18, 2015 23:46 IST2015-12-18T23:34:21+5:302015-12-18T23:46:39+5:30
औरंगाबाद : महात्मा गांधी मिशन संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या विभागांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनातून उलगडला वृत्तपत्रांचा इतिहास
औरंगाबाद : महात्मा गांधी मिशन संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या विभागांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १८ व १९ रोजी येथे ‘ओपन डे’ चे आयोजन करण्यात आले आहे. म्हणजेच संस्थेच्या कोणत्याही विभागात या दोन दिवशी सर्वांसाठी प्रवेश खुला करण्यात आला आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या कार्यशाळाही या दोन दिवसांत घेण्यात येणार आहेत. तसेच एमजीएमच्या वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागात संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त १९७५ पासून ते आजपर्यंतच्या वृत्तपत्रांचे दोनदिवसीय प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
या प्रदर्शनात छोट्या-मोठ्या तसेच स्थानिकपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतची सर्व वर्तमानपत्रे पाहायला मिळतात. हस्तलिखितामध्ये असलेले जुन्या काळचे वर्तमानपत्र पाहताना त्याकाळी काम करणे किती अवघड होते याची प्रचीती येते. ‘लोकमत’सह विविध दैनिकांच्या पहिल्या व दुर्मिळ प्रती पाहताना इथे भेट देणाऱ्यांना वेगळाच आनंद मिळत आहे.
३५ पानांचे ‘दि टाईम्स’, ३० पानांचे ‘दि स्कॉटस्मन’ आणि तब्बल ७१ पानांचे ‘टाईम्स ओमान’ ही परराष्ट्रीय वर्तमानपत्रेही येथे पाहायला मिळतात. मराठी भाषेखेरीज गुजराती, तामिळी इ. भाषांतील जुनी वर्तमानपत्रेही येथे ठेवली आहेत.
यावेळी वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागाच्या आशा देशपांडे, रेखा शेळके, सोनी आदींची उपस्थिती होती. हे प्रदर्शन दि. १९ रोजी ११ ते ५ या वेळेत सर्वांसाठी खुले असेल, अशी माहिती मैथिली भोकरे, सद्दाम खान, वैभवी जोशी, सुभाष वेताळ, किरण यादव आदी विद्यार्थ्यांनी
दिली.