तुळजापुरात बसणार ऐतिहासिक पथदिवे
By Admin | Updated: May 27, 2017 00:37 IST2017-05-27T00:35:55+5:302017-05-27T00:37:05+5:30
तुळजापूर :शहरातील दोन रस्त्यांवर ऐतिहासिक शैलीचे पथदिवे बसविण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला

तुळजापुरात बसणार ऐतिहासिक पथदिवे
लोकमत न्यूज नेटवर्क
तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची सतत गर्दी असते. हीच बाब लक्षात घेवून आता शहरातील दोन रस्त्यांवर ऐतिहासिक शैलीचे पथदिवे बसविण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला. यासोबतच राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजुने ‘सर्व्हिस’ रस्ते विकसित करण्याचेही यावेळी निश्चित झाले.
तुळजापूर विकास प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली उस्मानबााद येथे पार पडली. यावेळी आ. मधुकरराव चव्हाण, नगराध्यक्ष पंडित जगदाळे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, आप्पासाहेब पाटील, नरेंद्र बोरगावकर, पोनि राजेंद्र बोकडे, पालिका मुख्याधिकारी राजीव बुबणे, तहसीलदार दिनेश झांपले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
तब्बल एक वर्षानंतर शुक्रवारी नतून जिल्हाधिकारी गमे यांनी प्राधिकरणाअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेतला. तुळजापूर शहरामध्ये सतत भाविकांची गर्दी असते. या भाविकांना आवश्यक सोयीसुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने बैैठकीमध्ये चर्चा होवून अनेक विकास कामांना मंजुरी देण्यात आली. शहरातील भवानी मंदिर ते शुक्रवारपेठ पाण्याची टाकी तसेच शिवाजी चौक ते भवानी मंदिर महाद्वार या दोन रस्त्यांवर पुरातन पथदिवे बसविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच राष्ट्रीय आणि राज्य मार्गाच्या दोन्ही बाजुचे सर्व्हिस रस्ते वितकसित करण्याच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. दरम्यान, तुळजापूर (खुर्द) येथील सभागृह, सुलभ शौचालय बांधणे, शहरातील आराधवाडी, घाटशीळ रोड ईदगा मैदान, शुक्रवार पेठ, मटन मार्केट याठिकाणी सुलभ शौचालय उभारण्यासही हिरवा कंदिल मिळाला. दरम्यान, प्राधिकरणाअंतर्गत अर्धवट राहिलेल्या कामांना प्रथम प्राधान्य देवून ती कामे तातडीने पूर्ण करा, अशी सूचनाही संबंधित कंत्राटदारास जिल्हाधिकाऱ्यांनी केली. बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.