हिंगोलीकरांना डेंग्यूची धास्ती
By Admin | Updated: November 8, 2014 23:39 IST2014-11-08T23:34:23+5:302014-11-08T23:39:12+5:30
हिंगोली : शहरासह जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

हिंगोलीकरांना डेंग्यूची धास्ती
हिंगोली : शहरासह जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. शासकीय यंत्रणा तो डेंग्यू नसल्याचे तर खाजगी रुग्णालये तो डेंग्यूच असल्याचे सांगतात. त्यामुळे साधा ताप आला तरी लोक धास्तीने रुग्णालय गाठत आहेत. त्यात अनेकजण नाहक खर्चाने हैराण आहेत. बदललेले वातावरण व डासांचा प्रादुर्भाव यात भर पाडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
यावर्षी अल्पपर्जन्यामुळे दिवसा कडक ऊ न व रात्री थंडी असे विचित्र वातावरण अनुभवायला येत आहे. त्यातच पाणीटंचाईची चाहूलही अनेक ठिकाणी लागत आहे. त्यामुळे घरात पाण्याची साठवणूक करावी लागते. मात्र कोरडा दिवस पाळायला कोणीही तयार नाही. त्यामुळे जिल्हा डेंग्यूच्या छायेखाली असतानाही त्याचे गांभीर्य कोणालाही नसल्याचे दिसते. आरोग्य यंत्रणाही जेथे साथ उद्भवली तेथेच मलमपट्टी करीत आहे. तर जि.प., नगरपालिका, ग्रामपंचायतींसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वच्छता व जनजागरण ही आपली जबाबदारी आहे, असे वाटतच नाही. शिवाय रुग्ण हिवतापाचा की डेंग्यूचा याचे निदानही लवकर होत नाही. या चक्रव्यूहात अडकलेली सामान्य जनता डेंग्यूच्या विळख्यात सापडत आहे. हिंगोली शहराचा विचार केला तर स्वच्छता नियमित होणे शक्यच नाही. कारण पालिकेकडेच तेवढी यंत्रणा नाही. पाणीही तीन ते चार दिवसाआड मिळते. डासांचा प्रादुर्भावही आहे. अधूनमधून धूरफवारणी होते. हिवताप व तापाचेही रुग्ण आढळले तरी खाजगीचा रस्ता धरतात. आरोग्य विभाग गाफिलच राहतो. उपायही सुचविले जात नाहीत. ग्रामीण भागातही हीच स्थिती आहे. रुग्ण आढळल्यावरच धावपळ होते. ग्रामपंचायती स्वच्छता व पाण्याकडे लक्ष देत नाहीत. आरोग्य विभागही सतर्कतेसाठी प्रयत्न करीत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)