वर्धापन कार्यक्रमासाठी हिंगोली आगारात तयारी
By Admin | Updated: June 1, 2014 00:27 IST2014-05-31T23:57:39+5:302014-06-01T00:27:30+5:30
हिंगोली : एसटी महामंडळ रविवारी ६५ व्या वर्षांत पदार्पण करीत असताना पहिल्यांदाच राज्यभर वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे.
वर्धापन कार्यक्रमासाठी हिंगोली आगारात तयारी
हिंगोली : एसटी महामंडळ रविवारी ६५ व्या वर्षांत पदार्पण करीत असताना पहिल्यांदाच राज्यभर वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने हिंगोली आगारानेदेखील पहिल्यांदाच होणार्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे. त्यात उत्कृष्ट कामाबद्दल १५ कर्मचार्यांचा सत्कार तसेच चांगल्या कामासाठी सर्व कर्मचारी शपथ घेणार आहेत. १९४८ साली ३५ बसेसच्या ताफ्यासह ‘बॉम्बे रोड ट्रान्सपोर्ट’ची स्थापना झाली होती. त्यावर्षीच अहमदनगर ते पुणे दरम्यान पहिली बस धावली होती. कालांतराने बॉम्बे ट्रान्सपोर्टने ‘राज्य परिवहन महामंडळ’ हे नाव धारण केले. रविवारी हे महामंडळ ६५ व्या वर्षांत पदार्पण करीत असल्यामुळे राज्यभर वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. पहिल्यांदाच होणारा हा कार्यक्रम प्रत्येक बसस्थानक तसेच आगारात साजरा केला जाणार आहे. स्वतंत्र जिल्हा निर्मितीनंतर हिंगोली आगाराने बरीच प्रगती केली आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा १४ लाख रूपयांनी आगाराचे उत्पन्न वाढले आहे. गतवर्षी १ कोटी ७७ लाखावरून यंदा १ कोटी ९१ लाखांवर उत्पन्न गेले आहे. आजघडीला ५८ बसेस प्रतिदिवशी २२ हजार किलोमीटर धावतात. त्यातून दररोज ६ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त होते. त्यासाठी एकूण ३०२ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात ११९ चालक ११७ वाहक आणि ३२ प्रशासकीय कर्मचार्यांचा समावेश आहे. दिवसरात्र काम करणार्या या कर्मचार्यांतील उत्कृष्ट कार्याबद्दल १५ कर्मचार्यांचा सत्कार रविवारी करण्यात येणार आहे. त्यात अनुक्रमे ५ वाहक, चालक आणि प्रशासकीय कर्मचार्यांचा समावेश आहे. दोन आंतरराज्यीय, ८ लांब पल्ल्याच्या आणि २ मध्यम पल्ल्यांच्या गाड्यांवर या कर्मचार्यांनी उत्कृष्ट सेवा दिल्या आहेत. भविष्यात पारदर्शकता ठेवून कर्तव्यनिष्ठेने कार्य करण्यासाठी रविवारी आगारातील कर्मचारी शपथ घेणार आहेत. शिवाय आगाराची स्वच्छता आणि आत्मियता वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. सकाळी ६ वाजल्यापासून आगारात मंगलमय ध्वनी वाजविल्या जाणार आहे. आगारात रांगोळ्या काढल्या जाणार असून केळीचे खांब रोवून पूजा केली जाणार आहे. शनिवारी दुपारपासून पताके लावण्यास सुरूवात करण्यात आली. कर्मचार्यांबरोबर प्रवाशांना कार्यक्रमात समावून घेण्यासाठी ५० जणांना गुलाबपुष्पाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच १० किलो साखरेचे वाटप करण्यात येणार असल्याचे आगारप्रमुख सोनवणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)