हिंगोलीत आघाडी तर चारही ठिकाणी सेना
By Admin | Updated: September 14, 2014 23:36 IST2014-09-14T23:29:50+5:302014-09-14T23:36:09+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील पाचही पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडीच्या प्रक्रियेत हिंगोलीत काँग्रेस आघाडी आणि सेनगावात शिवसेना पुरस्कृत तर इतर तीन ठिकाणी सेनेचे वर्चस्व राहिले.

हिंगोलीत आघाडी तर चारही ठिकाणी सेना
हिंगोली : जिल्ह्यातील पाचही पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडीच्या प्रक्रियेत हिंगोलीत काँग्रेस आघाडी आणि सेनगावात शिवसेना पुरस्कृत तर इतर तीन ठिकाणी सेनेचे वर्चस्व राहिले.हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीताबाई नामदेव राठोड तर उपसभापतीपदी काँग्रेसचे शिवाजी ऊर्फ संतोष नारायण जगताप यांची निवड झाली. वसमतमध्ये शिवसेनेच्या विद्यमान सभापती राऊबाई बेले तर उपसभापतीपदी संभाजी चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. कळमनुरीत सभापतीपदी महानंदा लोणे तर उपसभापतीपदी मंगला अमिलकंठवार आणि औंढा सभापतीपदी राजेंद्र सांगळे तर उपसभापतीपदी अनिल देशमुख यांची बहुमताने निवड होऊन सेनेने बाजी मारली. दुसरीकडे सेनगावात नाट्यपूर्ण घडामोडीनंतर शिवसेनापुरस्कृत अपक्ष सदस्या शारदा संतोष पोपळघट यांची सभापतीपदी तर उपसभापतीपदी अपक्ष सदस्या संजीवनी सुभाष शिंदे यांची वर्णी लागली आहे.
हिंगोली येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीताबाई नामदेव राठोड तर उपसभापतीपदी काँग्रेसचे शिवाजी ऊर्फ संतोष नारायण जगताप यांची निवड झाली आहे. सीताबाई राठोड यांच्या निवडीमुळे सभापतीपदाचा मान पेडगावला दुसऱ्यांदा मिळाला आहे.
येथील पं.स.च्या सभागृहात रविवारी सकाळी १० ते १२ या वेळात सभापती- उपसभापती निवडीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर १२ ते २ या वेळात अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. दुपारी २ वाजता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सभापती- उपसभापतींची निवड जाहीर करण्यात आली. लताबाई गजानन जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राकाँच्या सिताबाई राठोड यांच्याविरुद्ध शिवसेनेच्या शिवनंदा पंढरी मगर यांच्यात सभापतीपदासाठी लढत झाली. त्यामध्ये राठोड यांना ९ तर मगर यांना ७ मते मिळाली आहेत. त्यामुळे सिताबाई राठोड यांची सभापतीपदी निवड झाली आहे. उपसभापतीपदासाठी काँग्रेसकडून भांडेगावचे शिवाजी जगताप तर शिवसेनेकडून लोहगावच्या अन्नपूर्णा वाबळे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. यात विनोद नानाराव नाईक, दुलेखाँ बनेखाँ पठाण यांनी माघार घेतली. जगताप यांना ९ तर वाबळे यांना ७ मते मिळाली. त्यामुळे उपसभापतीपदी शिवाजी जगताप यांची निवड झाली. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी काम पाहिले. त्यांना गटविकास अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी सहकार्य केले.
सभापती व उपसभापतीपदी अनुक्रमे सिताबाई राठोड व शिवाजी जगताप यांची निवड झाल्याचे घोषीत करून कडवकर यांनी त्यांना प्रमाणपत्र दिले. सभापती व उपसभापतीच्या निवडीची घोषणा होताच त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी पं.स. कार्यालयाच्या परिसरात फटाक्यांची आतषबाजी केली.
माजी सभापती छगन बनसोडे, उपसभापती विनोद नाईक, केशव मस्के, शामराव जगताप यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, आ. भाऊराव गोरेगावकर, आ. रामराव वडकुते यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती- उपसभापतींचा सत्कार करण्यात आला. यावेळी छगन बनसोडे, विनोद नाईक, केशव नाईक, दुलेखाँ पठाण, चंद्रकांत घोंगडे, दत्तराव सोळंके, गणेश चव्हाण आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नाट्यमय घडामोडी
सेनगाव पं.स.त राष्ट्रीय काँग्रेस ६, राष्ट्रवादी ४, भाजप ३, शिवसेना २, मनसे २ व अपक्ष ३ असे पक्षीय बलाबल असताना अंतर्गत कुरघोडीचे राजकारण, समविचारी पक्षात अंतर्गत ताळमेळ नसल्याने दोन अपक्ष सदस्यांनी राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना व पं.स. सदस्यांना झुलवत ठेवत दोन महिला अपक्ष सदस्यांनी बाजी मारत सभापती-उपसभापतीपद मिळविले.
सेनगाव : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी नाट्यपूर्ण घडामोडीनंतर शिवसेना पुरस्कृत अपक्ष सदस्या शारदा संतोष पोपळघट यांची तर उपसभापतीपदी अपक्ष सदस्या संजीवनी सुभाष शिंदे या दोन महिलांची वर्णी लागली आहे.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या असलेल्या पं.स.सभापती निवडीचे राजकारण अपक्ष सदस्यांच्या पथ्यावर पडले असून, काँग्रेसला झुलवत ठेवत शिवसेना- भाजप, राष्ट्रवादी युतीने पंचायत समितीवरील आपली सत्ता कायम टिकवून ठेवण्यात यश मिळविले आहे. सेना- भाजप, राष्ट्रवादी युतीत शिवसेनेला सभापतीपद देण्यात आले होते. सेनेकडून प्रारंभी लताबाई रहाटे यांचे नाव पुढे आले होते; परंतु शेवटच्या क्षणी कहाकर बु. पंचायत समिती गणाच्या सेना पुरस्कृत अपक्ष सदस्या शारदा संतोष पोपळघट यांचे नाव सभापती पदासाठी तर जवळा बु. गणाच्या अपक्ष सदस्या संजिवनी सुभाष शिंदे यांचे नाव पुढे आले. काँग्रेसच्या वतीने बाबाराव शिंदे यांनी सभापती पदासाठी तर उपसभापती पदासाठी मनसेचे बद्री कोटकर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. सभापती, उपसभापती पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत सेना-भाजप, राष्ट्रवादी युतीच्या शारदा पोपळघट यांना सेना २, भाजपा ३, राष्ट्रवादी ४ व अपक्ष २ अशी ११ मते मिळाली. तर काँग्रेस- मनसे युतीचे सभापती पदाचे उमेदवार बाबाराव शिंदे यांना काँग्रेस ६, मनसे २ व अपक्ष १ अशी ९ मते मिळाली. उपसभापती पदासाठीही सेना-भाजप- राष्ट्रवादी युतीचे उमेदवार संंजिवनी सुभाष शिंदे यांना ११ तर मनसेचे बद्री कोटकर यांना ९ मते मिळाली. एकंदर पं.स.त पाच राजकीय पक्षांच्या अवमेळात अपक्षांनी संधी साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. (वार्ताहर)
वसमत : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या विद्यमान सभापती राऊबाई बेले यांची अपेक्षेप्रमाणे फेरनिवड झाली आहे. तर उपसभापतीपदी संभाजी चव्हाण यांची निवड झाली आहे. सभागृहात शिवसेनेचे स्पष्ट बहुमत असल्याने दोन्ही पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करून शिवसेनेने पं.स.वरील वर्चस्व कायम राखले आहे.
वसमत सभापतीपदाच्या निवडीसाठी पं.स.सभागृहात रविवारी बैठक झाली. बैठकीस पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार अरविंद नरसीकर हे उपस्थित होते. तर गटविकास अधिकारी साहेबराव कांबळे, नायब तहसीलदार अब्दुल रब, सुनील अंभोरे आदींनी त्यांना सहकार्य केले. सभापतीपदासाठी विद्यमान सभापती राऊबाई पांडोजी बेले व रोहिणी देशमुख या दोघींचे तर उपसभापतीपदासाठी संभाजी चव्हाण व उमाकांत देशमुख या दोघांचे अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघारीनंतर राऊबाई बेले यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी नरसीकर यांनी जाहीर केले. उपसभापतीपदाचीही बिनविरोध निवड झाली. बैठकीसाठी शिवसेनेचे सर्व १६ सदस्य हजर होते. तर राकाँचे ८ पैकी ५ सदस्य हजर होते. राकाँचे दोघे गैरहजर होते.
आगामी विधानसभा निवडणूक पाहता माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी पं.स.च्या पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. निवड जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांचा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. (वार्ताहर)
औंढा नागनाथ : पंचायत समिती सभापती-उपसभापती या पदांवर शिवसेनेच्याच सदस्यांची निवड झाली आहे. सेनेने यावेळी भाजपासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने सभागृहामध्ये त्यांना बहुमत साधता आले.
पंचायत समिती सभापती, उपसभापतीपदाची निवड प्रक्रिया रविवारी दुपारी २ वाजता सभागृहामध्ये सुरू झाली. यावेळी सभापतीपदासाठी शिवसेनेकडून राजेंद्र सांगळे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून गजानन सांगळे तर उपसभापतीपदासाठी सेनेचे अनिल देशमुख, इंदिरा काँग्रेसचे शे. बुऱ्हाण, सत्यभामा नाईक यांनी नामनिर्देशन दाखल केले. परंतु ऐनवेळी शे. बुऱ्हाण यांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले. यावेळी सभागृहात १८ सदस्यांपैकी सेनेचे ९, इंदिरा काँग्रेसचे ५, राकाँचे ३ व भाजपाचा १ सदस्य उपस्थित होता. यावेळी सेनेने भाजपासोबत युती केल्याने सभागृहात त्यांचे संख्याबळ १० एवढे झाले. तर आघाडीकडे आठच सदस्य राहिले. त्यामुळे सभापतीपदी राजेंद्र सांगळे तर उपसभापतीपदी अनिल देशमुख यांची बहुमताने निवड करण्यात आली. सभागृहात हात उंचावून मतदान घेण्यात आले. परंतु यावेळी आघाडीच्या सदस्यांनी गुप्त पद्धतीने मतदान प्रक्रिया घेण्याची मागणी केली होती. या कारणामुळे निवड प्रक्रिया तब्बल दोन तास उशिराने सुरू झाली. यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार शाम मदनुरकर यांनी काम पाहिले. त्यांना गटविकास अधिकारी बी.एल.सुरोसे यांनी सहकार्य केले. निवड झाल्यानंतर माजी आ. गजानन घुगे यांनी नवनिर्वाचित सभापती राजेंद्र सांगळे यांचा सत्कार केला. यावेळी जि.प.चे कृषी सभापती राजाभाऊ मुसळे, जी.डी. मुळे, अंकुश आहेर, सुरजितसिंग ठाकुर, दत्तराव दराडे, शंकर यादव, विनोद खंडागळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
कळमनुरी : येथील पंचायत समितीच्या सभापती- उपसभापतीची निवड प्रक्रिया १४ सप्टेंबर रोजी पं.स.च्या सभागृहात पार पडली. सभापतीपदी महानंदा लोणे तर उपसभापतीपदी मंगला अमिलकंठवार यांची निवड करण्यात आली.
निवडीची प्रक्रिया सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाली. १२ वाजेपर्यंत नामनिर्देशन देणे व स्वीकारणे झाले. सभापतीपदासाठी दोन अर्ज व उपसभापतीपदासाठी ५ अर्जाची विक्री झाली. सभापतीसाठी महानंदा लोणे यांचा एकमेव अर्ज आला. उपसभापतीपदासाठी सेनेच्या मंगला अनिल अमिलकंठवार व काँग्रेसचे धनाजी सूर्यवंशी या दोघांचे अर्ज आले. निवडीची प्रक्रिया दोन वाजता सुरू करण्यात आली. सभापतीपदासाठी एकच अर्ज आल्याने महानंदा लोणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपसभापतीसाठी दोन अर्ज आल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेत सेनेच्या मंगला अनिल अमिलकंठवार यांना १४ मते तर धनाजी सूर्यवंशी यांना ६ मते मिळाली. त्यामुळे मंगला अमिलकंठवार यांची निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेत क्रांतीदेवी बोथीकर व निळाश्री बर्गे या दोन पं.स. सदस्या गैरहजर होत्या. पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते यांनी काम पाहिले. यावेळी नायब तहसीलदार के. एम. विरकुंवर, गटविकास अधिकारी कल्पना क्षीरसागर, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे, गटशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, वहीद पठाण, टोकवार आदी उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पं.स.त सेनेला स्पष्ट बहुमत असल्याने सेनेचाच सभापती, उपसभापती होणार हे निश्चित होते. सभापती व उपसभापती या दोन्ही महिलाच विराजमान झाल्या आहेत. निवडीनंतर सभापती, उपसभापतींचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)