हिमायतबागेत पुन्हा कुत्र्यांचा मोरावर हल्ला
By Admin | Updated: June 18, 2016 01:02 IST2016-06-17T23:58:53+5:302016-06-18T01:02:57+5:30
औरंगाबाद : हिमायतबागेत राष्ट्रीय पक्षी मोरावर शुक्रवारी सकाळी ४ ते ५ कुत्र्यांनी हल्ला केला. मात्र येथे फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्या मोराचे प्राण वाचले.

हिमायतबागेत पुन्हा कुत्र्यांचा मोरावर हल्ला
औरंगाबाद : हिमायतबागेत राष्ट्रीय पक्षी मोरावर शुक्रवारी सकाळी ४ ते ५ कुत्र्यांनी हल्ला केला. मात्र येथे फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्या मोराचे प्राण वाचले. हिमायतबागेत मोरांवर कुत्र्यांनी हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नसून दरवर्षी येथे होणाऱ्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक मोरांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा येथील मोरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.
एकेकाळी मोरांचे नंदनवन म्हणून ओळखली जाणारी हिमायतबाग आज मोरांसाठी शापित नंदनवन बनले आहे. हिमायतबाग परिसरात वाढलेली मानवी वस्ती, कुत्र्यांचा सुळसुळाट यामुळे मोरांना मुक्तपणे वावरणे धोक्याचे झाले आहे. यामुळेच एकेकाळी शेकडो मोर येथे दिसत. आता कधी तरी एक किंवा दोन मोरांचे दर्शन घडते. शुक्रवारी सकाळी ७.३० वाजेदरम्यान आंब्याच्या झाडाखाली एक मोर पिसारा फुलवत नृत्य करीत होता. अचानक चार ते पाच कुत्र्यांनी त्या मोरावर हल्ला केला. यावेळी फिरायला आलेले जैन वॉकर्स ग्रुपचे अशोक गंगवाल, प्रदीप पाटणी, पप्पू कासलीवाल, दिलीप बाकलीवाल यांनी त्या कुत्र्यांना हाकलले. मोराच्या मानेला व पायाला मोठी जखम झाली. गंगवाल व पाटणी यांनी दुचाकीवर मोराला खडकेश्वर परिसरातील सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. तेथे सकाळी ७.४५ वाजता डॉ.भालेराव यांनी मोरावर उपचार केले. मोराच्या मानेला ११ ते १२ टाके पडले व पायाला जखम झाली. यानंतर डॉक्टरांनी वन विभागासाठी पत्र दिले. मोर व पत्र घेऊन गंगवाल हे उस्मानपुरा येथील वन विभागाच्या कार्यालयात गेले. सुमारे तासभर वाट पाहिल्यानंतर तेथे वन विभागाचा कर्मचारी आला. त्यांच्याकडे मोराला सुपूर्द करण्यात आले.