नूतन नगराध्यक्षांपुढे आव्हानांचा डोंगर

By Admin | Updated: August 9, 2014 00:56 IST2014-08-09T00:32:40+5:302014-08-09T00:56:53+5:30

सुनील घोडके खुलताबाद खुलताबाद नगर परिषदेत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची शुक्रवारी निवडणूक पार पडली.

The hill of challenges before the new city chief | नूतन नगराध्यक्षांपुढे आव्हानांचा डोंगर

नूतन नगराध्यक्षांपुढे आव्हानांचा डोंगर

सुनील घोडके खुलताबाद
खुलताबाद नगर परिषदेत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची शुक्रवारी निवडणूक पार पडली. शहर विकास आघाडीच्या सुषमा भावसार यांची नगराध्यक्षपदी बहुमताने निवड झाली. मात्र यापुढे त्यांना शहराच्या विकासासाठी विविध आव्हानांचा सामाना करावा लागणार आहे. नागरिकांच्या प्रश्नांबरोबरच कर्मचाऱ्यांचा प्रश्नही त्यांना सोडावा लागणार आहे.
नगर परिषदेच्या नूतन अध्यक्षा भावसार यांना आगामी काळात खुलताबादकरांचा पाणी प्रश्न सतावणार आहे. सध्या खुलताबादकरांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असून गिरजा मध्यम प्रकल्पात सद्य:स्थितीत महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक
आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिने होत असले तरी अद्याप मुसळधार पाऊस झाला नाही. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई जाणवणार आहे. त्याचबरोबर नगर परिषदेत मोठ्या प्रमाणावर अधिकारी-कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत. ती पदे भरण्याचेही आव्हान स्वीकारावे लागणार आहे.
खुलताबाद शहरात अतिक्रमण वाढले असून नगर परिषदेच्या जागेवर होणारे अतिक्रमण ही मोठी डोकेदुखी होणार आहे. नाले सफाई, विद्युत लाईट बसविणे आदी कामे करून घ्यावी लागणार आहेत. नगर परिषदेतील अनेक सफाई मजूर हे कामाच्या नावाने इकडे-तिकडे गप्पा मारत फिरत असतात. त्यांच्यावरही लक्ष द्यावे लागणार आहे.
शहरातील लहानी आळी ते भद्रा मारुती, नगारखाना गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हे रस्ते अत्यंत खराब आहेत. या रस्त्यांवर पर्यटक व भाविकांची गर्दी असते, त्यामुळे येथे दुरुस्तीचे काम हाती घ्यावेच लागणार आहे. हीच अपेक्षा खुलताबादकरांना आहे.
नगराध्यक्षपदी भावसार; उपनगराध्यक्षपदी पटेल
खुलताबाद : नगर परिषदेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आ. प्रशांत बंब यांच्या शहर विकास आघाडीच्या सुषमा संजय भावसार या १६ विरुद्ध १ मताने विजयी झाल्या, तर उपनगराध्यक्ष मकसूद पटेल हे बिनविरोध निवडून आले.
आजच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रईसा इसाक कुरेशी या उमेदवार असतानाही रा.काँ., काँग्रेस, शिवसेना पक्षाच्या आठ नगरसेवकांनी आ. प्रशांत बंब यांच्या शहर विकास आघाडीला खुलेआम पाठिंबा दिला.
पीठासीन अधिकारी राजू नंदकर यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी शहर विकास आघाडीच्या सुषमा संजय भावसार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या रईस इसाक कुरेशी या रिंगणात होत्या. नगर परिषदेत शहर विकास आघाडीचे ८, काँग्रेस-४, राष्ट्रवादी काँग्रेस-४, शिवसेना-१ असे पक्षीय बलाबल असून, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुषमा भावसार यांनी १६ मते मिळवीत दणदणीत विजय मिळविला, तर राष्ट्रवादीच्या रईसा कुरेशी यांना स्वत:चेच मत मिळाले. उपनगराध्यक्षपदासाठी शहर विकास आघाडीचे मकसूद पटेल यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. (वार्ताहर)

Web Title: The hill of challenges before the new city chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.