अपहृत तरुणाची ३६ तासांनंतर सुटका

By Admin | Updated: September 30, 2015 13:25 IST2015-09-30T13:25:43+5:302015-09-30T13:25:43+5:30

१५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या तरुणाची ३६ तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून सिनेस्टाईल सुटका केली.

Hijacked youth rescued after 36 hours | अपहृत तरुणाची ३६ तासांनंतर सुटका

अपहृत तरुणाची ३६ तासांनंतर सुटका

>जालना : १५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या तरुणाची ३६ तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून सिनेस्टाईल सुटका केली. अपहरणकर्त्यांनी केलेल्या गोळीबारात फिर्यादी जखमी झाला आहे. ही थरारक घटना मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घनसावंगी तालुक्यातील रामगव्हाण येथील तलावाजवळ घडली.
जालना शहरातील जमुना नगर येथील एहतेशाम मंजूर अहमद (१७) याचे २७ सप्टेंबर अपहरण करण्यात आले होते. भाऊ इफतेखार अहेमद यांच्या फिर्यादीवरून गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या गजानन तौर व त्याच्या साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपहरणकर्त्यांच्या तावडीतून तरुणाची सुखरूप सुटका करून आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांच्या सूचनेवरून अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर व सहाय्यक पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली ५ वेगवेगळे पथक स्थापन केले होते. पथकांनी हिंगोली, वसमत, नांदेड या परिसरात पाठलाग करून अपहरणकर्त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्येक वेळेस अपहरणकर्ते ठिकाण बदलत गेल्याने ते हाती लागले नव्हते. अपहरणकर्त्यांनी इफ्तेखार अहमद यांना १५ लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानुसार जालन्यातील रामनगर, अंबड चौफुली, फिर्यादीचे राहते घर या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी बोलविण्यात आले. मात्र पोलिसांनी सापळा रचूनही ते हाती लागले नाहीत. अखेर अंबडजवळील गोलापांगरी या ठिकाणी इफ्तेखार यांना बोलावण्यात आले. अपहरणकर्त्यांना संशय आल्याने त्यांनी पुन्हा ठिकाण बदलत घनसावंगी - अंबड रस्त्यावरील रामगव्हाण तलावाजवळ बोलावले. त्याप्रमाणे ते पैसे घेवून गेले असता अपहरणकर्त्यांनी ५00 मीटर अंतरावर केवळ स्वत: येण्यास सांगितले. मात्र इफ्तेखार यांनी नकार देत परतीचा रस्ता पकडताच अपहरणकर्त्यांनी फोन करून पुन्हा तलावाजवळ येण्यास सांगितले. तेथे गेल्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांचे वाहन इफ्तेखार व पोलीस लपून बसललेल्या वाहनाच्या समोर लावले. त्याचवेळी पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी व भगीरथ देशमुख यांनी शिताफिने अपहृत मुलाची सुटका केली. अपहरणकर्त्यांनी पळ काढत पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात इफ्तेखार अहेमद यांना गोळी चाटून गेल्याने ते जखमी झाले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांच्या तक्रारीवरून घनसावंगी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घनसावंगी पोलिसांचे एक पथक अपहरणकर्त्यांच्या शोधार्थ रवाना झाले आहे.
गंगाखेड तालुक्यातील धनगरमोहा येथील शेख नोमान शेख उस्मान या १२ वर्षीय मुलाचे अंबाजोगाई बसस्थानकाजवळून अंगावर पॉवडर टाकून दोन महिला व एका पुरुषाने अपहरण केल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ च्या सुमारास घडली. शेख नोमान शेख उस्मान हा अंबाजोगाई येथील व्यंकटेश विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गात शिक्षण घेत असून जवळच असलेल्या स्वामी विवेकानंद या खाजगी वसतिगृहात तो राहतो. बकरी ईद, गणेशोत्सवाच्या सुट्या असल्याने तो आपल्या गावी आला होता. सुट्या संपल्याने तो २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता अंबेजोगाईला जाण्यासाठी निघाला. दुपारी ४ च्या सुमारास येथील वसतिगृहाकडे पायी जात असताना त्याच्या जवळून जाणार्‍या दोन बुरखाधारी महिला व एका पुरुषाने त्याच्या अंगावर पॉवडर टाकून बेशुद्ध केले व ऑटोरिक्षाने परळी येथे आणले. येथील उड्डाणपुलावर त्यास ऑटोतून खाली उतरविले. तेव्हा गुंगीच्या अवस्थेतून बाहेर आलेल्या शेख नोमान याला आपण कोठे आहोत हे समजत नसल्याने रडण्यास सुरुवात केली. यावेळी नागरिकांनी त्याच्या घरच्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती दिली. पुढे त्याला शेख उस्मान शेख फतरू यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

Web Title: Hijacked youth rescued after 36 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.