अपहृत माय-लेकाची चोवीस तासात सुटका
By Admin | Updated: May 25, 2015 00:25 IST2015-05-25T00:18:16+5:302015-05-25T00:25:43+5:30
नळदुर्ग : ऊसतोड मुकादमाला दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी त्याच्या पत्नीसह, मुलाचे २० मे रोजी दुपारी अपहरण करण्यात आले होते़ नळदुर्ग पोलिसांकडे शनिवारी तक्रार दाखल होताच

अपहृत माय-लेकाची चोवीस तासात सुटका
नळदुर्ग : ऊसतोड मुकादमाला दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी त्याच्या पत्नीसह, मुलाचे २० मे रोजी दुपारी अपहरण करण्यात आले होते़ नळदुर्ग पोलिसांकडे शनिवारी तक्रार दाखल होताच २४ तासाच्या आत त्या अपहृत महिलेसह मुलाची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणी संबंधिताविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील एन.एस.एल. शुगर फॅक्टरीमध्ये ऊसतोड टोळी पुरविणे, वाहतूक करण्यासाठी सुभाष भिकू राठोड (रा़ संगोळगी तांडा ता़आळंद जिग़ुलबर्गा) यानी जळकोट (ता़तुळजापूर) येथील अलीयाबाद तांड्यावरील सुनिल तारू राठोड यास ५ लाख ३५ हजार रूपये दिले होते़ दरम्यान, सुनिल राठोड यांनी सुभाष राठोड यास ४ लाख रूपयाची परतफेड होईल असे काम केले़ उर्वरित १ लाख ३५ हजार रूपये वसूल होत नसल्याने सुभाष राठोड यांनी इतर तिघाजणांसोबत जीपमधून २० मे रोजी जळकोट गाठले़ सुनिल राठोड, त्याची पत्नी व मुलाला हिशोब करायचा आहे म्हणून जीपमध्ये घालून नेले़ त्यानंतर सुनिल राठोड याला सोडून त्याची पत्नी व मुलाला पळवून नेल्याची तक्रार सुनिल राठोड यांनी २३ मे रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिली होती़ तक्रार दाखल होताच सपोनि फुलचंद मेंगडे यांनी सहकाऱ्यांसमवेत तपासाची चक्रे फिरवून २४ तासाच्या आत संगोळगी (ता़आळंद) येथून अपहृत महिलेसह मुलाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली़ ही कारवाई पोउपनि जी़एच़पठाण, हेकॉ अकोतकर, पोकॉ भोळे यांनी केली़ या प्रकरणी सुभाष राठोड याच्यासह त्याच्या तीन साथीदारांविरूध्द नळदुर्ग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दरम्यान, नळदुर्ग पोलिस तपासादरम्यान संगोळगी (ता़आळंद) येथे गेले असता आरोपी राठोड हा तेथून फरार झाला. (वार्ताहर)