अपहरण करून साडेबारा लाख लुटले
By Admin | Updated: August 29, 2016 00:52 IST2016-08-29T00:28:05+5:302016-08-29T00:52:49+5:30
औरंगाबाद : परभणी येथून मुंबईला जाणाऱ्या कुरिअर कर्मचाऱ्याचे जालना रेल्वेस्टेशन येथून अपहरण करून त्याच्याकडील १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि टपालाची ७० पाकिटे लुटण्यात आली.

अपहरण करून साडेबारा लाख लुटले
औरंगाबाद : परभणी येथून मुंबईला जाणाऱ्या कुरिअर कर्मचाऱ्याचे जालना रेल्वेस्टेशन येथून अपहरण करून त्याच्याकडील १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि टपालाची ७० पाकिटे लुटण्यात आली. लुटमार करणाऱ्या तोतया पोलिसांनी अपहरणकर्त्याला औरंगाबादेतील चिकलठाणा विमानतळाच्या भिंतीलगत आणून सोडले. ही घटना २६ आॅगस्ट रोजी रात्री घडली. याप्रकरणी औरंगाबाद लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी येथील साबू कुरिअरचे कर्मचारी अनिल भुजंगराव वाघमारे (३७, रा. धनेगाव, जि. नांदेड) हे २६ आॅगस्ट रोजी टपालाची ७० पाकिटे आणि रोख १२ लाख ५० हजार रुपये घेऊन रेल्वेने मुंबईला जात होते. रात्री ९.४० वाजेच्या सुमारास देवगिरी एक्स्प्रेस जालना रेल्वेस्टेशनवर आल्यानंतर पाच जण वाघमारे यांच्याजवळ आले.
आपण पोलिस असल्याचे सांगून त्यांनी त्यांचे आयकार्ड दाखविले. त्यांनी त्यास बॅगसह रेल्वेतून खाली उतरविले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात चल म्हणून स्थानकाबाहेर काढून एका जीपमध्ये (क्रमांक एमएच-२० सीओ ६०६८) बसविले. प्रथम त्यांनी वाघमारे यांचा मोबाईल आणि रोख रक्कम घेतली. त्यानंतर त्यांनी चालत्या गाडीत बॅगेतील सर्व पाकिटे फोडून पाहण्यास सुरुवात केली. विमाततळाच्या भिंती लगत वाघमारे यांना सोडून सर्व आरोपी पसार झाले. (प्रतिनिधी)
ही घटना जालना रेल्वेस्थानकावर घडली आहे. त्यामुळे तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद झाली असेल, असा कुरिअर मालकाचा अंदाज होता. त्यामुळे त्याससोबत घेऊन ते जालना स्टेशन येथे गेले. तेव्हा तेथे सीसीटीव्ही नसल्याचे त्यांना समजले. पोलिसांनी मात्र वाघमारे यांच्याकडेच या घटनेची चौकशी सुरू केली आहे.