महामार्गचा हलगर्जीपणा
By Admin | Updated: December 24, 2016 00:51 IST2016-12-24T00:51:20+5:302016-12-24T00:51:57+5:30
उमरगा : मुंबई-हैदराबाद या महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली

महामार्गचा हलगर्जीपणा
उमरगा : मुंबई-हैदराबाद या महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, जागोजागी पडलेले खड्डे, खचलेल्या साईडपट्ट्याही अपघाताला निमंत्रण देत आहेत. असे असतानाच सध्या महामार्ग रूंदीकरणाचे काम सुरू असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने
सूचना फलक लावणे, बॅरिगेटींग लावणे, रंगीत पट्ट्या ओढणे याकडेही महामार्ग प्रशासनाचा कानाडोळा झाला आहे. यामुळेच शुक्रवारी येणेगूरनजीकच्या पुलावर दोन बसची टक्कर होऊन पाच जणांचा बळी गेला.
मुंबई-हैदराबाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या काम सध्या हाती घेण्यात आले आहे. मात्र, हे काम करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने कंत्राटदार कंपनीकडून काळजी घेतलीजात नसल्याचे दिसत आहे. नवीन तयार केलेला रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, यावरही खड्डे पडण्यास सुरूवात झाल्याचे काही ठिकाणी पहावयास मिळत आहे. हा महामार्ग देशातील अनेक प्रमुख शहरांना जोडतो. त्यामुळे या मार्गावरून रोज हजारो छोट्या-मोठ्या वाहनांची वाहतूक असते.
मुंबई, पुणे, सोलापूरपर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण झालेले असून, सोलापूर ते कर्नाटक सीमेपर्यंतचे ८० किमीच्या चौपदरीकरणाचे काम सध्या चालू आहे. त्यामुळे जुन्या रस्त्याची डागडुजी करण्याकडे महामार्ग रस्ते विकास महामंडळाने दुर्लक्ष केलेले आहे.
जुन्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच दस्तापूर ते कर्नाटक सीमेपर्यंत ४० किमी अंतरावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, या भागात रोज किमान एक तरी छोटा-मोठा अपघात घडत आहे.
या मार्गालगतच्या येणेगूर, दाळिंब, येळी, बलसूर, जकेकूर, उमरगा, तुरोरी, तलमोड आदी गावातील नागरिकांनी सातत्याने या महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल आवाज उठविला, आंदोलनेही केली. मात्र, प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही. यातील सर्वाधिक अपघात दस्तापूर ते कर्नाटक सीमा या
४०-४५ किमीच्या अंतरात घडत आहेत. (वार्ताहर)