शहरात सर्वात उंच तिरंगा फडकणार
By Admin | Updated: June 11, 2016 00:17 IST2016-06-10T23:55:36+5:302016-06-11T00:17:19+5:30
औरंगाबाद : दिल्ली आणि मुंबईपाठोपाठ औरंगाबादेत सर्वात उंच राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकणार आहे.

शहरात सर्वात उंच तिरंगा फडकणार
औरंगाबाद : दिल्ली आणि मुंबईपाठोपाठ औरंगाबादेत सर्वात उंच राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकणार आहे. शहराच्या मध्यभागी व दर्शनी भागात तिरंगा ध्वज उभारण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत झाली आहे. ही समिती सात दिवसांत जागेचा शोध घेईल, असा निर्णय शुक्रवारच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
याकरिता अंदाजे एक ते दीड कोटींचा खर्च अपेक्षित असून, १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनापर्यंत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या पुढाकाराने शहरात स्मारकीय ध्वजस्तंभ उभारण्याचा प्रयत्न आहे.
या स्मारकीय ध्वजस्तंभ उभारणीचे काम १७ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावयाचे आहे. त्यासाठी शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीस राजभवनाचे प्रबंधक वसंत साळुंके, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. नवीनचंद्र रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एम. एम. सुरकटवार, उपायुक्त जितेंद्र पापळकर, डॉ. विजयकुमार फड, उद्योजक संदीप नागोरी व अधिकारी उपस्थित होते. दिल्ली, मुंबई व हैदराबाद येथे स्मारकीय ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. त्याच धर्तीवर शहराच्या मध्यवस्तीत व दर्शनी भागात हा ध्वजस्तंभ उभारण्याची चर्चा झाली. २०० फूट उंच हा तिरंगा ध्वज उभारला जाणार आहे.
२४ तास ध्वज फडकणार
शहरातील जालना रोडवरील उच्च न्यायालय प्रांगण, कॅनॉट गार्डन, सिद्धार्थ उद्यान, क्रांतीचौकातील कालाचबुतरा, दूध डेअरीजवळील जागा, ज्योतीनगर, बाबा पेट्रोलपंप, छावणी, मुकुंदवाडी चौक या जागांची पाहणी करण्यात येणार आहे. समिती ७ दिवसांत जागेचा शोध घेऊन अहवाल सादर करील. नागरिकांना त्या स्मारक परिसरात थांबता येईल, एवढी मोठी जागा शोधावी लागणार आहे. स्मारकासाठी व ध्वजस्तंभासाठी विशिष्ट प्रकारचे साहित्य वापरण्यात येणार आहे. २४ तास हा ध्वज फडकत राहणार आहे.
ध्वजासाठी रेआॅनचे कापड वापरणार
शहरात सर्वात उंचीचा तिरंगा फडकणार असल्यामुळे हा तिरंगा ध्वज खादीचा न वापरता रेआॅन कापडाचा वापरण्याचा विचार केला जात आहे. त्यासाठी राष्ट्रध्वजाच्या नियमावलीत सुधारणा करावी लागणार असून, तसा प्रस्ताव राजभवनामार्फत गृहविभागाकडे पाठविण्यात आला आहे. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतरच राष्ट्रध्वजासाठी रेआॅनचे कापड वापरण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.