खुंटेवाडीतील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाचा लळा !

By Admin | Updated: April 4, 2017 23:21 IST2017-04-04T23:19:47+5:302017-04-04T23:21:04+5:30

तामलवाडी उच्चशिक्षणाचा लळा लागल्याने अवघ्या दोनशे उंबरठ्याच्या या गावाचे चित्र झपाट्याने बदलले आहे.

High school admission to Khuntewadi students! | खुंटेवाडीतील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाचा लळा !

खुंटेवाडीतील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाचा लळा !

संतोष मगर तामलवाडी
जिरायत शेती, त्यामुळे उत्पन्न नाही. उद्योग, व्यवसायाचा अभाव असल्याने हाताला रोजगारही नाही. अशा बिकट परिस्थितीत आयुष्य बदलण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पालकांनी पाल्यांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत केले आणि पाहता पाहता गावात प्राध्यापक, इंजिनिअर, शास्त्रज्ञांची फौजच उभी राहिली. उच्चशिक्षणाचा लळा लागल्याने अवघ्या दोनशे उंबरठ्याच्या या गावाचे चित्र झपाट्याने बदलले आहे.
तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी हे साधारण एक हजार लोकवस्तीचे गाव. गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत नाही, स्वतंत्र महसूल दर्जा नाही.
एवढेच कशाला पोस्ट आॅफिस, रेशन दुकानही नाही. येथे दोनएकशे कुटुंबे येथे राहतात. शेती हाच ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय असला तरी पाण्याची कसलीही शाश्वती नसल्याने त्यावर संसाराचा गाडा हाकणे अवघड झालेले. परिसरात उद्योगधंद्याचाही अभाव. त्यामुळे गावात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली. अशा स्थितीत शिक्षण हाच परिवर्तनासाठीचा एकमेव मार्ग असल्याचे शिक्षकांनी ग्रामस्थांच्या मनावर बिंबविल्यानंतर पालकांनी जागरूकपणे पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रीय केले.
आज २३ वर्षानंतर या गावात उच्चशिक्षितांची नवी पिढी उदयास आल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे खुंटेवाडीत केवळ पहिली ते चौथीपर्यंतच्याच शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. मात्र त्यानंतरही आर्थिक झळ सोसून पाल्यांच्या शिक्षणात कमी पडणार नाही याची दक्षता पालकांनी घेतली. त्यामुळेच येथील अनेकजण आज सोलापूरसह इतर शहरात उच्चशिक्षण घेत असताना दिसतात.

Web Title: High school admission to Khuntewadi students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.