औरंगाबादमध्ये परराज्यातील बाजरीला उच्चांकी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:39 AM2018-10-23T11:39:12+5:302018-10-23T11:40:23+5:30

बाजारगप्पा : आवक घटल्याने  बाजरीने  मागील १० वर्षांतील भाववाढीचा विक्रम मोडला आहे.

High price for other states imported Bajra in Aurangabad | औरंगाबादमध्ये परराज्यातील बाजरीला उच्चांकी भाव

औरंगाबादमध्ये परराज्यातील बाजरीला उच्चांकी भाव

googlenewsNext

- प्रशांत तेलवाडकर (औरंगाबाद)

आवक घटल्याने  बाजरीने  मागील १० वर्षांतील भाववाढीचा विक्रम मोडला आहे. विशेषत: उत्तर प्रदेश व राजस्थानमधून येणाऱ्या बाजरीला २२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत आहे. स्थानिक बाजरीने २ हजार रुपयांचा पल्ला गाठला असून, आॅक्टोबर हिट अजूनही सुरू आहे. थंडी पडण्याआधीच ग्राहकांना भाववाढीने हुडहुडी भरायला लागली आहे.

पूर्वी बाजरी ही गरिबांची समजली जायची. आता विशेषत: हिवाळ्यात गव्हापेक्षा बाजरी व ज्वारी खाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे आता केंद्र सरकारने ज्वारी व बाजरीचा पोषक तृणधान्यामध्ये समावेश केला आहे, तसेच ज्वारीच्या हमीभावात ७३० रुपयांनी वाढ करून २४५० रुपये, तर बाजरीच्या हमीभावात ५२५ वाढ करून १९५० रुपये प्रतिक्विंटल केला आहे. 

दुसरीकडे पावसाने ओढ दिल्याने बाजरीची वाढ खुंटली, तसेच राज्यात अनेक भागांत पिके जळाली. काही ठिकाणी बाजरीवर बुरशीअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनात ४० ते ६० टक्क्यापर्यंत घट होईल, असा अंदाज आहे. औरंगाबादेत उत्तर प्रदेश व राजस्थानमधून मोठ्या प्रमाणात बाजरीची आवक होत असते. मात्र, या राज्यातून येणाऱ्या नवीन बाजरीची आवक कमालीची घटली आहे.

मागील वर्षापेक्षा यंदा या दोन्ही राज्यांत ६० टक्के उत्पादन कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. परिणामी, परराज्यातील बाजरी आठवडाभरात १०० रुपयांनी महाग होऊन १९५० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाऊन पोहोचली आहे. यासंदर्भात ठोक व्यापारी नीलेश सोमाणी म्हणाले, मागील महिनाभरात बाजरी २०० ते २५० रुपयांनी महागली. मागील वर्षी १४५० ते १६०० रुपये परराज्यातील बाजरीला दर होता, आता दर २२०० रुपयांपर्यंत वाढले असल्याचे त्यांंनी सांगितले.
 

Web Title: High price for other states imported Bajra in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.