उच्चभ्रूंचे वस्त्रच बनले ‘तिच्या’ शिक्षणाचे अस्त्र..!
By Admin | Updated: June 18, 2014 01:42 IST2014-06-18T01:03:36+5:302014-06-18T01:42:54+5:30
एस.आर. मुळे , शिरूर अनंतपाळ वडिलांचे कपड्याला इस्त्री करण्याचे दुकान. गावातल्या लोकांची धुण्याला आलेली कपडे धुवायची आणि त्यांना कडक इस्त्री करायची हा त्यांचा व्यवसाय.

उच्चभ्रूंचे वस्त्रच बनले ‘तिच्या’ शिक्षणाचे अस्त्र..!
एस.आर. मुळे , शिरूर अनंतपाळ
वडिलांचे कपड्याला इस्त्री करण्याचे दुकान. गावातल्या लोकांची धुण्याला आलेली कपडे धुवायची आणि त्यांना कडक इस्त्री करायची हा त्यांचा व्यवसाय. जिथे पोट भरायची मारामार तिथे आधीच इंजिनिअरींग करणाऱ्या भावाला पैसे पुरविताना नाकीनऊ यायचे. अशा स्थितीत ती वाघिण होऊन इस्त्रीच्या दुकानात दुसऱ्याच्या कपड्यांना इस्त्री करायला उभी रहायची. उच्चभ्रुंचे वस्त्रच जणू तिच्या शिक्षणाचे अस्त्र बनले आणि शिरूर अनंतपाळच्या धोंडीराम काळगे यांच्या रुपालीने दहावीच्या परिक्षेत ९१ टक्के गुण मिळवून आपल्या यशाचा झेंडा फडकाविला.
शिरूर अनंतपाळमधील धोंडीराम काळगे. ना शेती ना वाडी. गावातील पैशाचे व्यवहाराने नटलेल्या भारतीय स्टेट बँकेला खेटून एक लाँड्रीचे दुकान थाटलेले. गावातल्या साऱ्यांचे कपडे तिथे इस्त्री आणि धुण्याला येतात. त्याला तीन अपत्य. बायको गृहिणीच. आपल्या आयुष्यात शिक्षण चुकले म्हणून हे नशिबी आले या उद्वेगाने संतापलेल्या धोंडीरामला शिक्षणाची खरी किंमत कळलेली. तरी मोठा मुलगा लवकर आधाराला आला. मात्र मधल्या मुलाला शिकविण्यासाधी आधीच आटापिटा केलेला. त्याच्या अभियांत्रिकीचा खर्च करता-करता परवड न परवडणारी.
सोबतीला तिसरी मुलगी दहावीला. जिथे वाढत्या महागाईने भल्या-भल्यांच्या गरजा कमी केल्या तिथे धोंडीराम यांच्या आयुष्यात गरजा वाढूच लागलेल्या. मुलगी रुपाली ही शाळेत तशीच हुशार निघाली. वडिलांच्या कष्टाला सार्थ ठरवित तिने अभ्यास करून दहावीला ९१ टक्के मिळविले आहेत. कधी कधी स्वत: इस्त्री हातात घेऊन वडिलांना मदतही केली. अनेक मुलींचे फॅशनबेल कपडे इस्त्रीला आले की हेलकावे खाणाऱ्या मनाला तिने आतल्या आत दाबले. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून त्याचे सोने केले.
मुलगी गुणी आहे : काळगे
माझ्या मुलीने ९१ टक्के गुण मिळविले हे ऐकूण मला खुप आनंद झाला. मुलापाठोपाठ मुलगीही चांग़ले शिक्षण घेऊन आपले नाव काढेल. आमच्या नशिबी आलेल्या या गरिबाीने आम्ही त्रासलो. परंतु मुलांच्या शिक्षणासाठी वाट्टेल ते करू. पण त्यांना शिकवू. प्रसंगी उपाशी राहू पण त्यांच्या शिक्षणाला खर्च कमी पडू देणार नाही. मुले आमचे नाव काढताहेत. ही खुप जमेची बाजू असल्याचेही त्यांनी सांगितले.
दुकानातच स्वीकारला सत्कार...
रुपालीला ९१ टक्के गुण मिळाल्याचे कळताच शाळेने तिचा सत्कार करायचे ठरविले. तर रुपालीने आपला सत्कार आपले कष्टाचे स्थळ असलेल्या इस्त्री दुकानातच व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आणि शिक्षक प्रा. शिवाजी मादलापुरे, बाबूराव जांगडे, आत्मलिंग पुजारी यांनी तिथे जाऊन तिचा सत्कार केला.