छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या कार्यक्रमादरम्यान आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. ठाकरेसेनेचे सदस्य पळवल्याचा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप सदस्य कल्याण गायकवाड यांची भररस्त्यात कॉलर पकडली. या घटनेमुळे पंचायत समिती परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, दानवे कार्यकर्त्यांसह हातात काठी घेऊन पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर बसल्याचे पाहायला मिळाले.
'सत्ता आणि पैशाचा गैरवापर'"आमचे सदस्य कुठे आहेत?" असा जाब विचारत अंबादास दानवे यांनी भाजपचे सदस्य कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडली. ठाकरेसेना आणि भाजपचे कार्यकर्ते यावेळी समोरासमोर आले आणि एकच गोंधळ उडाला. दरम्यान दानवे यांनी भाजपवर गंभीर आरोप करताना म्हटले की, "आमच्या तीन सदस्यांना भाजपने सत्तेची ताकद आणि पैशाचा वापर करून पळवले आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू असून आम्ही हे सहन करणार नाही." या प्रकरणावर आपण लवकरच सविस्तर खुलासा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
राजकीय गणिते बदलणार?आज जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांचे भवितव्य ठरणार आहे. ठाकरेसेनेने (उद्धवसेना) ज्या पक्षाला अध्यक्षपद मिळेल, त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेतली असल्याची चर्चा आहे. पैठण पंचायत समिती मात्र निर्विवादपणे शिंदेसेनेच्या ताब्यात राहण्याचे संकेत आहेत. विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीमध्ये भाजपला रोखण्यासाठी उद्धवसेना आणि शिंदेसेना एकत्र येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. यामुळेच भाजपने देखील आपल्या हातात सत्ता कशी राहील यासाठी राजकीय डावपेच आखले आहेत. यातूनच ठाकरेसेना आणि भाजप आमनेसामने आल्याच्या पाहायला मिळाले.
निवडणूक प्रक्रिया सुरूजिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, दुपारी २ वाजता विशेष सभा होणार आहे. पीठासन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २० मार्चपूर्वी ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. मात्र, आजच्या राड्यामुळे निवडणुकीच्या निकालावर आणि पुढील युतीवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Chaos erupted during Sambhajinagar Panchayat Samiti elections. Ambadas Danve confronted a BJP member, alleging Sena members were poached. Accusations of power misuse surfaced, impacting potential alliances and election outcomes.
Web Summary : संभाजीनगर पंचायत समिति चुनाव में भारी हंगामा हुआ। अंबादास दानवे ने शिवसेना सदस्यों को छीनने का आरोप लगाते हुए भाजपा सदस्य का सामना किया। सत्ता के दुरुपयोग के आरोप लगे, संभावित गठबंधनों और चुनाव परिणामों पर असर पड़ा।