केज तालुक्यातील २० गावांत ‘हाय अलर्ट’
By Admin | Updated: September 26, 2016 00:14 IST2016-09-25T23:39:46+5:302016-09-26T00:14:01+5:30
मधुकर सिरसट , केज बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांना वरदान ठरलेलेले मांजरा धरण रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या नोंदीनुसार ७५ टक्के भरले आहे

केज तालुक्यातील २० गावांत ‘हाय अलर्ट’
मधुकर सिरसट , केज
बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांना वरदान ठरलेलेले मांजरा धरण रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या नोंदीनुसार ७५ टक्के भरले आहे. पाच वर्षानंतर तीन जिल्ह्यांतील ७३ गावांच्या सिंचनाचा आणि ६१ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. कोणत्याही क्षणी मांजराचे दरवाजे उघडण्यात येणार असल्यामुळे धरणाखालील २० गावांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
मुसळधार पावसामुळे तालुक्यातील मांजरा, केजडी, बोभाटी, खटकळी, होळना, लेंडी मारवड नदी या नद्यांसह नाल्या-ओढ्यांना मोठमोठे पूर आले होते. उंदरी, हादगाव, चिंचोलीमाळी, येवता, भालगाव, सौंदना, केवड, वरपगाव या गावांच्या नदीपात्रात पाणी न मावल्यामुळे पुराचे पाणी शेतात गेले. परिणामी सुपीक जमीन धुऊन गेली आहे. त्यामुळे शेतीचे आणि पिकाचे नुकसान झाले.
रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या नोंदीनुसार २२४ दलघमी क्षमता असलेल्या मांजरा धरणात १८१.४८० दलघमी एवढा पाणीसाठा वाढला आहे. पाणी पातळी ६४१.३२ मीटर एवढी असून, जिवंत पाणी साठ्याची टक्केवारी ७५ टक्के एवढी आहे, तर मृतसाठ्यासह ही टक्केवारी ८०.९८ टक्के एवढी असल्याची माहिती मांजरा धरणाचे शाखाधिकारी अनिल मुळे यांनी दिली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा ओघ ४०० क्युमेक प्रती सेकंद या वेगाने आहे.