‘आयएसओ’मुळे ग्रा.पं.होणार हायटेक
By Admin | Updated: August 21, 2014 23:25 IST2014-08-21T23:24:49+5:302014-08-21T23:25:26+5:30
विठ्ठल भिसे, पाथरी ई-पंचायत ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी ग्रामपंचायतींना संग्राम कक्ष बनविण्यात आले

‘आयएसओ’मुळे ग्रा.पं.होणार हायटेक
विठ्ठल भिसे, पाथरी
ई-पंचायत ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी ग्रामपंचायतींना संग्राम कक्ष बनविण्यात आले. त्यानंतर आता ग्रामपंचायती आयएसओ करून हायटेक करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू झाला आहे. परभणी जिल्ह्यात ९० ग्रामपंचायती पहिल्या टप्प्यात आयएसओ करण्यासाठी निवडण्यात आल्या आहेत. २८ आॅगस्टपर्यंत यासाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.
एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाड्या गतवर्षीपासून आयएसओ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत अनेक अंगणवाड्यांच्या परिसरात सर्व भौतिक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्याच बरोबर गुणवत्तेमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने आता ग्रामपंचायती आयएसओ करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून तयारी करून घेतली जात आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायत विकासाचा महत्त्वाचा दूवा समजला जातो. ग्रामपंचायतींना सहाय्यता मिळाल्यापासून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होऊ लागला आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या कार्यालयाबाबत मात्र आजपर्यंत फारसे लक्ष देण्यात आले नाही.
ग्रा़ पं़ ना कार्यालय उपलब्ध नसल्याने ग्रा़ पं़ चा कारभार सरपंचाच्या घरूनच चालायचा. ग्रामसेवकांची बॅग सांभाळणारे लोकप्रतिनिधी असायचे. परंतु आता हळूहळू परिस्थिती बदलू लागली आहे.
संत गाडगे बाबा अभियान, तंटामुक्त अभियान, पर्यावरण संतूलित समृद्ध ग्राम योजना, निर्मलग्राम, नरेगासारख्या योजनेमुळे ग्रा.पं. कारभारात अमुलाग्र बदल झाले आहेत. टेबल, खूर्च्या उपलब्ध नसणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये आता संगणक कक्ष तयार झाले आहेत. तेराव्या वित्त आयोगातून शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. ग्रामपंचायतीमध्ये मोठी सुधारणा होऊ लागल्याने आता ग्रामपंचायती ‘आयएसओ’ करून हायटेक केल्या जाणार आहेत. ग्रा. पं. कार्यालयात भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करण्यापासून ते सामाजिक कामात ग्रामपंचायतीचा सहभाग या मोहिमेत वाढविला जाणार आहे. जिल्ह्यात २०१३-१४ या वर्षात ९० ग्रामपंचायती आयएसओसाठी प्रास्तावित करण्यात आल्या आहेत.
या ग्रामपंचायतीचे नामांकन २८ आॅगस्टपर्यंत केले जाणार आहे. त्यानंतर विशेष पथकाकडून तपासणी केली जाणार आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत ग्रामपंचायतींना सुधारण्यासाठी वेळ मिळणार आहे. यामुळे ग्रामपंचायत आयएसओ करण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे.