विकासकामांचा हायटेक प्रचार

By Admin | Updated: October 6, 2014 00:43 IST2014-10-06T00:26:29+5:302014-10-06T00:43:33+5:30

औरंगाबाद : सध्या निवडणूक प्रचारासाठी नवनवीन फंडे वापरले जात आहेत.

Hi-Tech promotion of development works | विकासकामांचा हायटेक प्रचार

विकासकामांचा हायटेक प्रचार

औरंगाबाद : सध्या निवडणूक प्रचारासाठी नवनवीन फंडे वापरले जात आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी विविध साधनांचा वापर होताना दिसतोय. त्यातच हायटेक प्रचारयंत्रणेद्वारे विकासकामांचे लाईव्ह प्रदर्शन करणारी एलईडी व्हॅन सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. शहरातील चौकाचौकांत दाखविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना लोकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एलईडी वॉलसारख्या यंत्रणेमुळे भर उन्हातदेखील फिल्म दाखविणे शक्य झाले आहे. याच हायटेक यंत्रणेचा वापर करीत राजेंद्र दर्डा यांनी आपल्या विकासकामांच्या प्रसाराचे काम हाती घेतले. त्यांच्या या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहता ही प्रचारपद्धती चांगलीच प्रभावी ठरत आहे.
राजेंद्र दर्डा यांनी प्रचारात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. पदयात्रांच्या माध्यमातून त्यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यासोबतच सध्या त्यांच्या प्रचारयंत्रणेत दाखल झालेली एलईडी मोबाईल व्हॅन लोकांचे आकर्षण ठरत आहे. राजेंद्र दर्डा यांनी आमदार, मंत्री या नात्याने केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा माहितीपटाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडला जात आहे. लहान मुलांपासनू ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण या व्हॅनला आवर्जून भेट देत आहे.
एलईडी व्हॅनचे आकर्षण
राजेंद्र दर्डा यांच्या कटआऊटसह निवडणूक चिन्ह पंजा आणि आकर्षक अशा घोषवाक्यांनी सजलेली ही एलईडी व्हॅन सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या व्हॅनमध्ये एलईडी वॉलद्वारे माहितीपटाचे प्रसारण केले जाते. स्क्रीनचा आकार मोठा असल्याने दूरवरच्या लोकांनाही माहितीपट स्पष्ट दिसतो. व्हॅनमध्ये साऊंड सिस्टीम, वॉल एलईडी प्रोसेसर व जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या एलईडी व्हॅनद्वारे शहरातील विविध भागांमध्ये राजेंद्र दर्डा यांच्या प्रचाराचे काम हायटेक पद्धतीने जोमाने सुरू आहे. त्याला सर्वच भागांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
एलईडी वॉलचा वापर आतापर्यंत आम्ही विविध कार्यक्रमांसाठी केला आहे. निवडणूक प्रचारासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारची एलईडी मोबाईल व्हॅन बनविण्यात आली आहे. लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता हा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला आहे.

Web Title: Hi-Tech promotion of development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.