खेळ झाले हायटेक

By Admin | Updated: June 1, 2014 00:27 IST2014-06-01T00:05:19+5:302014-06-01T00:27:55+5:30

लहान मुलांच्या भावविश्वात होतोय बदल

Hi-Tech game | खेळ झाले हायटेक

खेळ झाले हायटेक

हिंगोली : काळ बदलला आणि एकूणच वातावरणातही बदल झाला. विज्ञान-तंत्रज्ञानाने माणसाचे जगणेच बदलविले. स्वाभाविकपणे यात लहान मुलांचे भावविश्वही बदलले. त्यांचे खेळ बदलले आणि अर्थातच त्यामुळे त्यांच्या जगण्यातही खूप वेगळेपणा आला आहे. पूर्वीचे खेळ भावना, संवेदनांशी संबंधित होते. निसर्गाशी जुळलेले होते. आता मात्र मुले निसर्गापासून आणि मैदानी खेळांपासून नकळतपणे दूर होत आहेत. पूर्वी आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो, शिवाशिवी, दोरीवरच्या उड्या, फुगडी, विषामृत, लगोरी, कंचे, विटी-दांडू, टिक्कर-बिल्ला, लपाछपी, सळाक खुपसणी, भातुकली, साखळी शिवाशिवी, दोघांचा एक-एक पाय बांधून खेळणे, आंधळी कोशिंबीर, तळ्यात-मळ्यात, चंगा अष्टा, भोवरा फिरविणे असे सारे खेळ मुलांच्या बुद्धीला आणि शरीराला व्यायाम देणारे होते. आताही यातले काही खेळ मुले खेळतात, पण मुलांचा ओढा मात्र तंत्रज्ञानाशी संबंधित खेळांकडे वाढला आहे. सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत. त्यात मुले सध्या वेगवेगळ्या शिबिरात तर काही घरातल्या संगणकावर गेम्स खेळण्यात व्यस्त आहेत. या सार्‍यांमध्ये काही मुलांनी मात्र गोष्टींची पुस्तके वाचण्याचा आग्रह धरला आहे. बहुतेक मुलांना मात्र कॉमिक्स हवे आहेत. यात पारंपरिक खेळांकडे मुलांचे दुर्लक्ष होत असले तरी, पालकांच्या सजगतेने आणि त्यांच्या पुढाकाराने मुलांना काही पारंपरिक खेळ खेळण्यातही मजा येते आहे. यातला उद्देश एकच. दुपारी मुलांनी उन्हात न खेळता सावलीत बैठे खेळ खेळावेत. यासंदर्भात लोकमतने शहरातल्या वेगवेगळ्या स्तरातील मुलांशी बोलून, पाहणी करून काढलेला निष्कर्ष. पहिली पसंती क्रिकेटलाच वय कुठलेही असो पण मुलामुलींना क्रिकेटने फार वेड लावले आहे. प्लास्टिकच्या बॅटपासून लाकडी बॅटपर्यंत बॅट कुठलीही असो, शेजारच्या मुलांसह क्रिकेट खेळण्यात तासन्तास मुले व्यस्त आहेत. अपार्टमेंट संस्कृतीत जगणारी मुलेही पार्किंगच्या जागेत दुपारच्या वेळेत भन्नाट क्रिकेटमध्ये रंगली आहेत. यात मुलांच्या क्रिकेटचे सामने धम्माल रंगत आहेत. एकूण मुलांची संख्या किती आहे. त्याप्रमाणे सम आणि विषम संख्येच्याही दोन चमू तयार करून मुले क्रिकेट खेळत आहेत. हा खेळ त्यांच्यासाठी इतका महत्त्वाचा आहे की, स्कोअर बोर्ड, पंच आदींचीही व्यवस्था मुलांनी केली आहे. त्यात त्यांचा लंच टाईमही काटेकोर ठरला आहे. पालकांकडे हट्ट धरून डझनभर बॉलची व्यवस्था या मुलांनी आधीपासूनच केली आहे. कारण कुणी जोरात चेंडू टोलविला आणि एखाद्याच्या खिडकीची काच तोडून चेंडू घरात गेल्यावर तो परत मिळणार नाही, याची खात्री मुलांना आहे. चेंडू मिळाला नाही तर खेळ बंद. त्यामुळे एक चेंडू हरविला वा कुणी परत दिला नाही तर खेळात व्यत्यय येऊ नये म्हणून ही काळजी आहे. पण शहराच्या कुठल्याही भागात सहजपणे नजर टाकली तर सर्वात जास्त पसंती क्रिकेटलाच असल्याचे कुणाच्याही लक्षात येते. कार्टुन्स, संगणकावरील खेळ सध्या गुगल प्लेवर मुलांसाठी प्रचंड खेळ आहेत. अनेकांकडे संगणक आणि टॅब आहेत. त्यावर वेगवेगळे खेळ डाऊनलोड करण्यात आले आहेत. मध्यमवर्गीय घरात मात्र मुले संगणकावर खेळ खेळण्यात व्यस्त आहेत. संगणकावर आवडीचा खेळ खेळण्यासाठी दोन भावंडांमध्ये भांडणे होत असल्याची स्थिती आहे. साधारणत: पालक नोकरीच्या निमित्ताने व्यस्त असताना दुपारची वेळ संगणकावर घालविण्यात मुले आघाडीवर आहेत. मुले घरी एकटी असल्याने यासंदर्भात पालकांचा नाईलाज आहे. त्यात छोटा भीम, डोरेमॉन, हतौडी या कार्टुन्सने मुलांना अक्षरश: वेड लावले आहे.

Web Title: Hi-Tech game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.