महिलादिनीच रस्त्याने घेतला ‘तिचा’ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:05 IST2021-03-09T04:05:21+5:302021-03-09T04:05:21+5:30
जायकवाडी : खड्ड्यात गाडी आदळल्यामुळे ४२ वर्षीय महिलेचा रस्त्यावर पडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ...

महिलादिनीच रस्त्याने घेतला ‘तिचा’ बळी
जायकवाडी : खड्ड्यात गाडी आदळल्यामुळे ४२ वर्षीय महिलेचा रस्त्यावर पडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पैठण-औरंगाबाद रस्त्यावरील धनगाव फाट्यावर घडली. महिलादिनीच रस्त्याने ‘तिचा’ बळी घेतल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रेखा यशवंत पाटील (रा. पन्नालालनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, रेखा यशवंत पाटील या पतीसमवेत औरंगाबादवरून पैठणकडे दुचाकीवरून जात होत्या. दरम्यान, धनगाव फाट्याजवळ असलेल्या खड्ड्यांमध्ये त्यांची दुचाकी आदळली गेली. त्यात रेखा पाटील या जमिनीवर आदळल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ पैठण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्याला माहिती मिळाली. यावेळी पैठण पोलीस ठाण्याचे कर्मचारी दिनेश दाभाडे, शरद पवार, तुकाराम मारकळ हे पुढील तपास करीत आहेत. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे औरंगाबाद-पैठण रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे आणखी किती निष्पापांचा बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे.