दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्या
By Admin | Updated: August 24, 2014 00:29 IST2014-08-24T00:29:48+5:302014-08-24T00:29:48+5:30
पालम : शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले यांनी केली आहे.

दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्या
पालम : पावसाळा संपत आला तरीही पाऊस पडलेला नाही. शेतातील उभी पिके पाण्याअभावी वाळून जात आहेत. त्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले यांनी केली आहे.
शहरातील जायकवाडी वसाहतीच्या परिसरात शिवसेनेच्या वतीने २३ आॅगस्ट रोजी दुपारी एक वाजता पालम-पूर्णा-गंगाखेड तालुक्यातील कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा. बंडू जाधव, डॉ. राहूल पाटील, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ. शिवाजी दळणर, प्रा. पंढरीनाथ धोंडगे, सखुबाई लटपटे, सुनिता घाडगे, सुरेश ढगे, दशरथ भोसले, चंद्रकांत रुद्रवार आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना वडले म्हणाले, शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेने खरिपाची पेरणी उरकून घेतली आहे. परंतु पाऊस पडत नसल्याने निसर्गाच्या संकटात शेतकरी सापडला आहे. शासनाने केवळ मराठवाडा टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केलेला आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास दुष्काळ जाहीर करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तातडीने दुष्काळ जाहीर करून दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. सिंचनाचा अभाव व शेतीमालाला भाव नसल्याने जगाचा पोशिंदा शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदत करावी व दुष्काळ राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी बाळासाहेब राखे, विष्णू मुरकुटे, गजानन पवार, गजानन सिरस्कर, प्रल्हाद रोकडे, शिवाजी खंडागळे, अंकूश भातमोडे, हनुमंत पौळ, सुग्रीव पौळ, पांडुरंग होळगे, सतीश शिंदे, मोहिते यांच्यासह पालम, गंगाखेड व पूर्णा तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)