रडगाणे गाण्याऐवजी धाडसाने मदत करा
By Admin | Updated: December 5, 2014 00:59 IST2014-12-05T00:58:25+5:302014-12-05T00:59:33+5:30
जालना : राज्यावर कर्जाचा डोंगर असल्याचे रडगाणे गाण्याऐवजी नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने धाडसाने पुढे येऊन सर्वतोपरी मदत करावी,

रडगाणे गाण्याऐवजी धाडसाने मदत करा
जालना : राज्यावर कर्जाचा डोंगर असल्याचे रडगाणे गाण्याऐवजी नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने धाडसाने पुढे येऊन सर्वतोपरी मदत करावी, असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केले.
जिल्ह्यातील डांबरी, शेवगा, रुई-भायडी या दुष्काळग्रस्त गावांना पवार यांनी गुरुवारी सकाळी भेटी दिल्या. ग्रामस्थांशी संवाद करीत पीक परिस्थतीची पाहणी केली. यावेळी आ. राजेश टोपे, माजी खा. अंकुशराव टोपे, आ. धनंजय मुंडे, आ. सतिष चव्हाण, आ. अमरसिंह पंडित, माजी आ. चंद्रकांत दानवे, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख आदी उपस्थित होते.
मराठवाडा, विदर्भातील अभुतपूर्व दुष्काळामुळे सर्वसामान्य शेतकरी पूर्णत: कोलमडला आहे. याआपत्तीत शेतकऱ्यांना आता भक्कम मदतीचीच नितांंत गरज आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी पडलेल्या भयावह दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने या शेतकऱ्यांना मदतीचा मोठा हात दिला. त्याचप्रमाणे आता या शेतकऱ्यांना सर्वार्थाने पाठबळाची गरज असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आपण दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करत असून त्यातून पुढे आलेली वस्तुनिष्ठ परिस्थिती अधिवेशनातून सरकारच्या निदर्शनास आणून देणार आहोत, असे ते म्हणाले. सरकारी पातळीवरुन मदतीसंदर्भात वेगवेगळी वक्तव्ये होत आहेत. परंतु यासंदर्भात तात्काळ ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहेत, असेही ते म्हणाले. मराठवाड्यात आजही आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना बॅँकाद्वारे नोटिसा बजावल्या जात आहेत. कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडीत होत असून डीपीसाठी पैश्यांची मागणी होत असल्याबद्दल पवार यांनी तीव्र खंत व्यक्त केली. दरम्यान या दौऱ्या प्रसंगी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा पवार यांच्यासमोर मांडल्या, मदती द्यावी, अशी विनंती केली. (प्रतिनिधी)
जायकवाडीतील जलसाठ्यातून औरंगाबाद व जालना जिल्ह्यासाठी पिण्याच्या पाण्याचे तात्काळ आरक्षण करावे व उर्वरित पाण्याचेही नियोजन करावे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
४सर्वसामान्य शेतकऱ्यांतून संपूर्ण पीक कर्जाची माफी, वीज बिलांची माफी, पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळावी, शेतसारा माफ व्हावा. शैक्षणिक शुल्क पूर्णत: माफ करावे, अशी अपेक्षा होत असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. कापूस उत्पादकांना बोनस ऐवजी एकरी सहाय्य अनुदानाची अपेक्षा आहे. सोयाबीन उत्पादकांचाही तोच सूर आहे, असेही ते म्हणाले.
४दुष्काळी स्थितीत शेततळ्यांची कामे करावीत. प्रकल्पातील गाळ काढणी करावी, छोट्या-मोठ्या नद्यांवर सिमेंट, शिरपूर, भूमिगत किंवा कोल्हापुरी बंधारे उभारावेत. दुष्काळी भागात चारा डेपो किंवा छावण्या सुरू कराव्यात, अशीही अपेक्षा व्यक्त होत असल्याचे ते म्हणाले.४
शेतकऱ्यांच्या दिवसेंदिवस आत्महत्या वाढत आहेत. उस्मानाबादेत एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. या स्थितीत सरकारने आम्ही बरोबर आहोत. अडचणीत साथ देवू, असा विश्वास शेतकऱ्यांना दिला पाहिजे, असे मत पवार यांनी व्यक्त केले. पवार यांनी शेतकऱ्यांशी सुसंवाद साधत, खरीप व रबी हंगामातील पिकांची स्थिती जाणून घेतली. पाणीटंचाईची समस्या ऐकली.