मनपाने रोखले साडेतीनशे जणांचे वेतन
By Admin | Updated: December 25, 2015 00:07 IST2015-12-24T23:44:49+5:302015-12-25T00:07:18+5:30
औरंगाबाद : महानगरपालिका प्रशासनाने मालमत्तेचे विवरणपत्र दाखल न करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचा निर्णय घेतला आहे.

मनपाने रोखले साडेतीनशे जणांचे वेतन
औरंगाबाद : महानगरपालिका प्रशासनाने मालमत्तेचे विवरणपत्र दाखल न करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात वर्ग १, २ आणि ३ मधील केवळ ३१८ जणांचेच पगार काढण्यात येणार आहेत. परिणामी उर्वरित ३६२ जणांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पगारापासून वंचित राहावे लागणार आहे.
मनपा आस्थापनेवरील अधिकारी कर्मचाऱ्यांना (वर्ग १ ते ३) त्यांच्या मालमत्तेचे विवरणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यासाठी डिसेंबर २०१४ अखेरपर्यंतची मुदत देण्यात आली होती; परंतु मुदतीत कोणीच विवरणपत्र दाखल केले नव्हते. त्यामुळे चालू वर्षात मनपाच्या प्रशासकीय विभागाने वारंवार मुदतवाढ देऊन संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना मालमत्तेचे विवरणपत्र सादर करण्याचे आदेशित केले; परंतु त्यानंतरही नोव्हेंबर २०१५ पर्यंत केवळ ३१८ जणांनीच असे विवरणपत्र सादर केले.
त्यामुळे आता प्रशासकीय विभागाने विवरणपत्र न दाखल केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन करायचे आहे तेवढ्याच अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी लेखा विभागाला सादर करण्यात आली आहे. उर्वरित अधिकारी कर्मचाऱ्यांचे डिसेंबर महिन्याचे वेतन पुढील आदेशापर्यंत करूनये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मनपात प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील मंजूर पदांची संख्या ८८८ इतकी आहे. त्यापैकी सध्या २९८ पदे रिक्त आहेत. भरलेल्या ६८० पदांपैकी ३१८ जणांनीच विवरणपत्र दाखल केले आहे. त्यात २८ अधिकारी आणि २९० कर्मचारी आहेत.