चार तालुक्यांत पावसाची दमदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:52 IST2017-09-13T00:52:42+5:302017-09-13T00:52:42+5:30
शहर व तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर दीड वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला.

चार तालुक्यांत पावसाची दमदार हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहर व तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर दीड वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. परतूर, मंठा व घनसावंगी तालुक्यांतही पावसाने दमदार हजेरी लावली. कुंडलिका नदीवरील बंधाराही मंगळवारी सकाळी ओसंडून वाहिला.
सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ढग दाटून आल्यानंतर शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. जुना जालना भागातील टाऊन हॉल भागात रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. जालना तालुक्यातील निधोना, घाणेवाडी, गुंडेवाडी, तांदूळवाडी, पीरपिंपळगाव, माळशेंद्रा, वंजाउम्रद, जामवाडी शिवारात पावसाचा जोर अधिक होता.
परतूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यामुळे दुधना नदीला पूर येऊन निम्न दुधना नदीची पाणीपातळी वाढली आहे. वाटूर रोडवरील चांदणी पुलाखालून एक नाला वाहतो.
या नाल्यातील पाणी आसपासच्या शेतात शिरले. जाफराबाद, भोकरदन, अंबड व बदनापूर तालुक्यांत काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. मंगळवारी पहाटे जिल्ह्यात सरासरी २०.४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४९६.८१ मिलीमीटर पाऊस झाला आहे.