- दादासाहेब गलांडेपैठण (छत्रपती संभाजीनगर): पैठण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास ८६ हजार हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतातील उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची गंभीर दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार विलास भुमरे यांनी गुरुवारी (दि. १८) अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे पालकमंत्र्यांना चक्क ट्रॅक्टरमधून जाऊन पाहणी करावी लागली.
'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची मागणीपाहणी दौऱ्यानंतर बोलताना पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले, "मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. तसेच, शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्याची गरज असून, यावरही चर्चा झाली आहे. लवकरच, पुढील पाच-सहा दिवसांत याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे."
ट्रॅक्टरमधून नुकसानीचा आढावाकातपूर येथे पाहणी करताना शेतात जाण्यासाठी रस्ताच शिल्लक नसल्याचे पाहून पालकमंत्री आणि त्यांच्यासोबतच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टरमधून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ट्रॅक्टरमधून बसून पिकांचे प्रत्यक्ष किती नुकसान झाले आहे, याचा अंदाज घेतला. पाहणी दरम्यान, त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, कार्यकारी अभियंता प्रशांत संत, उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, दीपक मोरे, भाऊ लबडे यांच्यासह इतर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी जायकवाडी (नाथसागर) धरण १०० टक्के भरल्यामुळे त्याचे जलपूजनही केले. या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.