दमदार पावसाने बळीराजा सुखावला
By Admin | Updated: June 16, 2017 23:36 IST2017-06-16T23:34:29+5:302017-06-16T23:36:55+5:30
नांदेड : गत दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे बळीराजा काही प्रमाणात सुखावला असून जिल्ह्यात पेरणीला वेग आला आहे

दमदार पावसाने बळीराजा सुखावला
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : गत दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे बळीराजा काही प्रमाणात सुखावला असून जिल्ह्यात पेरणीला वेग आला आहे. मात्र दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी १०० मि. मी. पाऊस झाल्यानंतरच कापूस व सोयाबीनची पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक डॉ.तुकाराम मोटे यांनी केले आहे.
सध्या जिल्ह्यातील सर्वदूर भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नसून पाच - सहा तालुक्यात पेरणीसाठी चागंला पाऊस झाला आहे. परंतु सर्वच भागातील शेतकरी पेरणी करीत आहे. ज्या भागात १०० मिलीमिटरपेक्षा कमी पाऊस असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी १०० मि. मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे म्हटले आहे. कमी पाऊस असल्याने जमिनीतील ओलावा कमी असतो त्यामुळे पेरणी केलेले बियाणे उगवत नाही, परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती असते. शिवाय कोरड्या जमिनीत टाकलेले बियाणे किड्यामुंग्या खाण्याची दाट शक्यता असते. यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी केल्यास फायदेशीर ठरेल, असा सल्लाही कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. गत दोन दिवसांपासून बहुतांश भागात पेरणीला वेग आला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी कापसाची लागवड करीत असून सोयाबीनची पेरणीही करीत आहेत. या हंगामात पेरणीसाठी जवळपास ७ लाख ८९ हजार २१७ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्यात जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या सोयाबीन आणि कापसाची मोठ्या प्रमाणात पेरणी होणार असून उर्वरित क्षेत्रावर मूग, उडीद, ज्वारी आदी पिकांची पेरणी होणार आहे. शेतकऱ्यांनी पेरणीचा खर्च कमी करण्यासाठी घरचे बियाणे वापरावेत, पंरतु त्याआधी सदर बियाणाची उगवण क्षमता तपासून घेणे आवश्यक आहे. पेरणी करीत असतांना बीजप्रक्रिया करावी, तसेच उगवण शक्ती तपासून घ्यावी, असे केल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही, असेही ते म्हणाले़