छत्रपती संभाजीनगर : अतिवृष्टीच्या तडाख्यातून कसाबसा सावरलेला जिल्ह्यातील शेतकरी आता बाजारातही निर्घृण लुटीचा बळी ठरत आहे. केंद्राने जाहीर केलेल्या हमीभावाचा पुसटही मागमूस नसताना कापूस, सोयाबीन व मका यांसारखा शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागत आहे. हमीभावाचा कायदा नसल्याची पोकळी आणि व्यापाऱ्यांची मनमानी, यामुळे शेतकऱ्यांच्या दुःखात भर पडली असून, बळीराजा ‘हमी’ नव्हे तर ‘हवालदिल’ अवस्थेत बाजारपेठेत उभा आहे. या परिस्थितीवरून विधिमंडळातही गदारोळ झाला असला तरी जमिनीवरील वास्तव मात्र बदललेले नाही.
जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील खरीप पिके जमिनीसह वाहून गेले, तर शेतात पाणी साचल्याने जागेवरच पिके सडून गेली. माथ्यावर शेती असलेल्या शेतकऱ्यांची काही प्रमाणात पिके वाचली आहेत. यातून हाती आलेला शेतमाल बाजारात विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत; केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीभावानुसार कुठेही शेतमालाची खरेदी होत नाही. केंद्र शासनाने २०२५-२६ या वर्षासाठी पिकांचे किमान समर्थन मूल्य (हमी भाव) जाहीर केला आहे. यात सोयाबीनसाठी प्रति क्विंटल ५ हजार ३२८ रुपये दर जाहीर केला असताना गंगापुरात ४ हजार ५३, कन्नड, वैजापूर, सिल्लोडमध्ये ४ हजार ५०० आणि लासूर स्टेशन येथे ४ हजार ३५० रुपये प्रति क्विंटलचा सर्वोच्च दर मिळाला आहे, तर क्वालिटी चांगली नसल्याच्या कारणावरून ३ हजार रुपयांपर्यंत सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे नाईलाजाने या ५ बाजार समित्यांमध्ये एकूण ८ हजार ४३१ क्विंटल सोयाबीनची शेतकऱ्यांनी विक्री केली आहे.
लासूर स्टेशन येथे कापसाच्या गाड्या परत पाठविल्याकेंद्र शासनाने मध्यम धाग्याच्या कापसाला ७ हजार ७१०, तर लांब धाग्याच्या कापसाला ८ हजार ११० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. असे असताना जिल्ह्यातील एकाही बाजार समितीमध्ये हमीभावानुसार कापसाची खरेदी केली जात नाही. जिल्ह्यात सर्वोच्च सिल्लोडमध्ये ७ हजार ३०० आणि सर्वांत कमी ५ हजार रुपये प्रति क्विंटल सिल्लोडमध्येच कापसाला भाव मिळाला. कापसाची क्वालिटी चांगली नसल्याच्या कारणावरून १५ ते २० गाड्या परत पाठविण्यात आल्या.
मक्याची अर्ध्यापेक्षा कमी दराने खरेदीकेंद्र शासनाने मक्याला या वर्षासाठी प्रति क्विंटल २ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. प्रत्यक्षात या दरात कुठेही मक्याची खरेदी केली जात नाही. जिल्ह्यात सर्वोच्च १ हजार ८५० रुपये प्रति क्विंटलचा भाव कन्नड आणि वैजापुरात मिळाला, तर सर्वांत कमी ९०० रुपये प्रति क्विंटलचा भाव कन्नडमध्ये मिळाला. त्यामुळे हमीभावाच्या अर्ध्यापेक्षा कमी दराने खरेदी मक्याची खरेदी होताना दिसून येत आहे. परिणामी, शेतकऱ्यांची लूट सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एकही लोकप्रतिनिधी पुढाकार घेत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
विधानसभेतही गाजला प्रश्नराज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी शेतमालाच्या हमीदराची अंमलबजावणी होत नसल्याच्या कारणावरून गदारोळ झाला. काँग्रेसचे आ. विजय वडेट्टीवार यांनी याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला ‘लोकमत’ने घेतलेल्या आढाव्यानंतर पुष्टी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाली कोण हा प्रश्न अनुत्तरित आहे.
Web Summary : Farmers in Chhatrapati Sambhajinagar face exploitation due to low prices for crops like soybean, cotton, and maize, far below the government's Minimum Support Price (MSP). Despite legislative uproar, the situation remains dire, leaving farmers helpless and vulnerable to unfair trading practices.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में किसान सोयाबीन, कपास और मक्का जैसी फसलों के लिए कम कीमतों का सामना कर रहे हैं, जो सरकार के न्यूनतम समर्थन मूल्य (एमएसपी) से बहुत कम है। विधायी हंगामे के बावजूद, स्थिति गंभीर बनी हुई है, जिससे किसान असहाय और अनुचित व्यापार प्रथाओं के प्रति संवेदनशील हैं।