नांदेडात दमदार पाऊस

By Admin | Updated: August 28, 2014 00:00 IST2014-08-27T23:59:47+5:302014-08-28T00:00:53+5:30

नांदेड: मागील अडीच महिन्यातील सर्वच नक्षत्रात हुलकावणी दिलेल्या पावसाचे श्रावण संपताच दमदार आगमन झाले़

Heavy rain in Nanded | नांदेडात दमदार पाऊस

नांदेडात दमदार पाऊस

नांदेड: मागील अडीच महिन्यातील सर्वच नक्षत्रात हुलकावणी दिलेल्या पावसाचे श्रावण संपताच दमदार आगमन झाले़ मंगळवारी रात्री व बुधवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ असे असले तरी अद्याप नदी, नाल्यांची स्थिती चिंताजनक असून जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ६५३़८० मि़ मी़ पाऊस झाला आहे़ तर २७ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात झालेल्या पावसाची २२७़७१ मि़ मी़ नोंद झाली आहे़
चार नक्षत्र कोरडे गेल्यामुळे पेरण्यांसोबतच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे़ पावसासाठी सर्व ठिकाणी प्रार्थना करण्यात येत आहेत़ मात्र दिवसेंदिवस वातावरणातील कोरडेपणा कायम असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते़ गेल्या पंधरा दिवसांपासून कडक उन्हाच्या चटक्यांसोबतच उकाडा वाढला होता़
घामाच्या धारांनी वैतागलेल्या नांदेडकरांना पावसाची प्रतिक्षा होती़ आभाळ भरून आले तरी पाऊस पडत नसल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते़ अखेर पोळ्याच्या दिवशी पावसाने हजेरी लावली़ त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले़ श्रावण संपताच पावसाने पुन्हा जोरदार आगमन केले़ मघा नक्षत्रात सुरू झालेल्या पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी केले़
मंगळवारी रात्री झालेल्या या पावसामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावरून वाहत होते़ बुधवारी दुपारी जोरदार पाऊस सुरू झाला़ रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सुरू होता़ शहरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली़ हिंगोलीगेट उड्डान पुलाखाली तसेच शेजारी रस्त्यावर पाणीच पाणी झाले़ श्रीनगर, कलामंदिर, महावीरचौक, राजे मल्हारराव चौक, सिद्धांतनगर पाटीजवळ तसेच जुन्या नांदेडातील अनेक सखल भागात पाणी साचले होते़
श्री गणेश चतुर्थी व महालक्ष्मी सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा फुलल्या आहेत़ त्यात आजच्या पावसाने उत्साह वाढविला़ पाऊस नसल्यामुळे पोळा सणाची बाजारपेठ ओस पडली होती़ मात्र आता दोन दिवसांच्या पावसाने बाजारपेठेतील चित्र बदलले आहे़ गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच पावसानेही आपले आगमन केल्यामुळे भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे़ तरोड्याचा आठवड्याचा बाजार भर पावसातही भरला होता़
जिल्ह्यात २७ आॅगस्ट रोजी झालेल्या पर्जन्यमानाची नोंद पुढील प्रमाणे, नांदेड - २५२़८५ मि़ मी़, मुदखेड - १७७़३४, अर्धापूर - १७१़६८, भोकर - २५०- ९५, उमरी - २७६़०१़ कंधार - २०४़४७, लोहा - २१९़६७, किनवट - २६७़१०, माहूर - ३०८़६२, हदगाव - १८६़२६, हिमायतनगर - १७३़०४, देगलूर - २१३़०१, बिलोली - १८२़४०, धर्माबाद -२१५़३३, नायगाव - २३८़६०, मुखेड - ३०५़९६़ एकूण - २२७़७१ मि़ मी़ पावसाची नोंद झाली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Heavy rain in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.