औरंगाबाद : खेळताना गॅलरीच्या लोखंडी ग्रीलवर चढून खाली पडलेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीचा करुण अंत झाल्याची घटना विजयनगर येथे रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. श्रेया आकाश ढगे (वय १६ महिने) असे मृत बालिकेचे नाव आहे.
गारखेडा परिसरातील विजयनगर येथील आकाश ढगे हे व त्यांचे भाऊ शेजारी राहतात. भावाचे दोन मजली घर आहे. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या भावाच्या घरी आजारी पुतणीला भेटण्यासाठी काही नातेवाईक आले होते. तेथे आकाश यांची पत्नीही नातेवाईकांसोबत बोलत होती. यावेळी त्यांची १६ महिन्यांची कन्या श्रेया ही गॅलरीत खेळत होती. यावेळी गॅलरीच्या लोखंडी ग्रीलसोबत खेळताना ती अचानक खाली कोसळली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती बेशुद्ध झाली. यानंतर तिला एमजीएम रुग्णालयात आणि नंतर तेथून घाटीत दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान रात्री तिचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास पुंडलिकनगर ठाण्याचे हवालदार शेख नबी हे करीत आहेत.