आज सातारा-देवळाई आक्षेपांवर सुनावणी
By Admin | Updated: January 11, 2016 00:08 IST2016-01-11T00:06:20+5:302016-01-11T00:08:20+5:30
औरंगाबाद : सातारा-देवळाईमध्ये नगर परिषद असावी की महापालिका; याबाबत आलेल्या ४३८७ आक्षेपांची सुनावणी ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून

आज सातारा-देवळाई आक्षेपांवर सुनावणी
औरंगाबाद : सातारा-देवळाईमध्ये नगर परिषद असावी की महापालिका; याबाबत आलेल्या ४३८७ आक्षेपांची सुनावणी ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांच्या अध्यक्षतेखाली डीपीसी सभागृहात सुरू होणार आहे.
सुनावणीसाठी आक्षेपनिहाय कूपन देण्याची व्यवस्था सेतू सुविधा केंद्रातून करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या सेतू केंद्र बंद राहणार असल्याचे तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी सांगितले. आलेल्या आक्षेपांत २७ आक्षेप नगर परिषदेच्या विरोधात आहेत. आक्षेपकर्त्यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत.
सोमवारी सुनावणी घेऊन त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. नगर परिषदेच्या बाजूनेच सर्व नागरिकांचा कल असल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे या आक्षेपांच्या सुनावणीनंतर स्वत:च्या निष्कर्षाचे एक पत्र अहवालासोबत लावणार आहेत.
बहुतांश आक्षेप नगर परिषदेच्या बाजूनेच असल्यामुळे सुनावणीसाठी एकच दिवस लागेल.
शहरातील लोकप्रतिनिधींचा सातारा-देवळाईतील राजकीय रस संपल्यात जमा आहे. ५५ हजार लोकसंख्येसाठी फक्त २ वॉर्ड झाले तेही आरक्षित झाले. त्यामुळे यापुढे त्या भागात मनपा झाली तरी विशेष असा राजकीय फायदा होणार नाही.
४परिणामी स्वतंत्र नगर परिषद झाली तर २५ नगरसेवक निवडून येतील. नगराध्यक्षपदासाठी लॉबिंग केले जाईल. तसेच किमान १०० कोटींचे बजेट त्या न.प.चे असेल. त्यामुळे तो परिसर मनपात नकोच, अशी सेना-भाजपची धारणा आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी तर सुरुवातीपासून स्वतंत्र नगर परिषदेच्या बाजूने आहे.
सातारा-देवळाईतील नागरिकांच्या आक्षेपांवर सुनावणी होणार असल्यामुळे सेतू सुविधा केंद्र सोमवारी बंद राहणार आहे, अशी माहिती तहसीलदार मुंडलोड यांनी दिली. सेतू केंद्रातून आक्षेपकर्त्यांना कूपन दिले जाईल. त्या कूपनाच्या आधारे आक्षेपकर्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपले मत मांडता येईल. त्या मताची नोंद इतिवृत्तात घेतली जाईल.