मणियारच्या जामीन अर्जावर २० रोजी सुनावणी
By Admin | Updated: April 18, 2016 00:59 IST2016-04-18T00:59:10+5:302016-04-18T00:59:10+5:30
औरंगाबाद : श्रुती कुलकर्णी आत्महत्या प्रकरणातील आरोपी स्वप्नील मणियारने पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला आहे.

मणियारच्या जामीन अर्जावर २० रोजी सुनावणी
औरंगाबाद : श्रुती कुलकर्णी आत्महत्या प्रकरणातील आरोपी स्वप्नील मणियारने पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला आहे. न्या. एम.टी. जोशी यांच्या समोर शुक्रवारी सुनावणी झाली. खंडपीठाने शासनाला नोटीस बजावण्याचा आदेश दिला. जामीन अर्जावर पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे. यापूर्वी १५ फेब्रुवारी रोजी दाखल केलेला जामीन अर्ज स्वप्नीलने मागे घेतला होता.
स्वप्नील मणियारच्या छळाला कंटाळून सिडकोतील श्रुती कुलकर्णी या युवतीने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. औषधाची मात्रा जादा झाल्यामुळे (ओव्हर डोसमुळे) तिची प्रकृती खालावली. उपचारासाठी तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
श्रुतीच्या मोठ्या बहिणीच्या तक्रारीवरून स्वप्नीलविरुद्ध ‘आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत’ सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
त्यानंतर त्याने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला; परंतु तो फेटाळण्यात आला. त्यामुळे त्याने फेब्रुवारीत खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता; पण हा अर्ज त्याने मागे घेतला होता.
आता जामीन मिळावा यासाठी त्याने पुन्हा खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. अॅड. अभिजित दरंदले, सन्मय निंबाळकर मणियारची बाजू मांडत आहेत. खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून सिद्धेश्वर ठोंबरे यांनी बाजू मांडली, तर श्रुतीच्या बहिणीच्या वतीने अॅड. अभयसिंह भोसले यांनी काम पाहिले.