जिल्ह्यात एकूण उद्दिष्टाच्या केवळ २० टक्के कोरोना लसीकरण; आरोग्य कर्मचारी पुढे येईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 07:20 PM2021-01-30T19:20:45+5:302021-01-30T19:21:29+5:30

कोरोना प्रतिबंधक लसीकरण १६ जानेवारीला १० केंद्रांवर सुरू झाले. पहिल्या दिवसानंतर काही केंद्रे वाढवण्यात आली, तर आरोग्य केंद्रातून मोठ्या रुग्णालयात लसीकरण सुरू करण्यात आले.

Health workers did not come forward for the corona vaccine; Vaccination of only 20% of the total target in the district | जिल्ह्यात एकूण उद्दिष्टाच्या केवळ २० टक्के कोरोना लसीकरण; आरोग्य कर्मचारी पुढे येईनात

जिल्ह्यात एकूण उद्दिष्टाच्या केवळ २० टक्के कोरोना लसीकरण; आरोग्य कर्मचारी पुढे येईनात

googlenewsNext
ठळक मुद्देशहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील लसीकरणाचे प्रमाण कमी

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ९८०० आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी ६६६२ जणांनी लस घेतली. हे प्रमाण ६८ टक्के आहे. तसेच जिल्ह्याचे एकूण उद्दिष्ट ३३ हजार ४६८ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे असून त्याच्या तुलनेत आतापर्यंत केवळ २० टक्के लसीकरण पूर्ण झाले. यातही ग्रामीण भागातील लसीकरणाचे घटलेले प्रमाण शहरापेक्षा चिंताजनक आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण १६ जानेवारीला १० केंद्रांवर सुरू झाले. पहिल्या दिवसानंतर काही केंद्रे वाढवण्यात आली, तर आरोग्य केंद्रातून मोठ्या रुग्णालयात लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र, लसीकरणाची आकडेवारी फारशी वाढली नाही. दरम्यान, प्रमुख आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लस घेतली. त्यानंतर संख्या वाढली तरी ती समाधानकारक नसून ग्रामीण भागातील प्रतिसाद वाढवण्यासाठी केंद्रे ४ वरून ८ करण्यात आली, तर शहरात ९ केंद्रे असे जिल्ह्यात सध्या १७ केंद्रांवर लसीकरण होत आहे. दररोजच्या उद्दिष्टाच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्याचे लसीकरण ७० ते ८० टक्क्यात होत आहे. त्यामुळे राज्यातील रॅंकिंगमध्ये जिल्हा अद्यापही पहिल्या दहामध्ये आलेला नाही. गुरुवारी झालेल्या लसीकरणानुसार रॅंकिंगमध्ये औरंगाबाद २२ व्या स्थानी होता. नागपूर, चंद्रपूर पुढे, तर रत्नागिरी आणि नंदुरबार औरंगाबादच्या लसीकरणाच्या तुलनेत मागे होते. असे जिल्हा लसीकरण अधिकारी डाॅ. विजयकुमार वाघ यांनी सांगितले.

महिला अधिक
महिला डाॅक्टर, आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, परिचारिकांची संख्या आरोग्य कर्मचाऱ्यांत अधिक असल्याने साहजिकच लसीकरणात महिलांच्या लसीकरणाचा टक्का लक्षवेधी असण्याची शक्यता आहे. मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण हाच निकष असल्याने महिला आणि पुरुष आकडेवारी आरोग्य विभागाकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्याला दुसऱ्या डोसचा पुरवठा
१. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लसीकरणासाठी मनपा हद्दीसाठी २० हजार, तर ग्रामीण भागात १४ हजार लसी देण्यात आल्या होत्या. त्यातून जिल्ह्यातील एकूण ३३ हजार ४६८ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट होते.
२. दुसऱ्या टप्प्यासाठी शहराला २० हजार, तर ग्रामीण भागात १४ हजार डोस लसींचा पुरवठा झाला आहे. त्यातून ग्रामीणमधील १३ हजार, तर शहरातील २० हजार आरोग्य क्षेत्रातील लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाईल, असे आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले.
३. पहिल्या फेरीत आवश्यक दोन डोस आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यासाठी लसींचा पुरवठा केला आहे. बहुतांश सर्व प्रमुख वैद्यकीय अधिकारी, डाॅक्टरांनी, आरोग्य कर्माचाऱ्यांनी पहिला डोस घेतला आहे, असे लाळे म्हणाले.

आणखी उपाययोजना करू
कोरोना प्रतिबंधक लसीकरण होत असलेल्या ग्रामीण भागातील केंद्रांवर संपर्क अधिकारी नेमले आहेत. संपर्क अधिकारीही प्रत्यक्ष संवाद साधून लाभार्थ्यांना तयार करत आहेत. तसेच इच्छुक आरोग्य सेवकांना तत्काळ लसीकरण देऊन त्यांच्या सहकाऱ्यांना लस घेण्यासाठी विश्वास निर्माण करण्याचे काम सुरू आहे. लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न सुरूच असून रविवारच्या पोलिओ लसीकरण मोहिमेनंतर सोमवारपासून कोविडचे लसीकरण वाढव‌ण्यासाठी आणखी उपाययोजना करू.
- डाॅ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी, औरंगाबाद

गुरुवारच्या आकडेवारीनुसार झालेले लसीकरण
नागपुर : ७२.४० टक्के
चंद्रपूर : ७०.९० टक्के
औरंगाबाद : ७०.२६ टक्के
रत्नागिरी : ६९.५३ टक्के
नंदुरबार : ६० टक्के

किती जणांनी घेतली लस 
नागपूर ३२०० पैकी २३१७ जणांना लसीकरण
चंद्रपूर ११०० पैकी ७८० जणांना लसीकरण
औरंगाबाद १९०० पैकी १३३५ जणांना लसीकरण
रत्नागिरी ९५२ पैकी ६६२ जणांना लसीकरण
नंदुरबार ७०० पैकी ४२० जणांना लसीकरण
 

Web Title: Health workers did not come forward for the corona vaccine; Vaccination of only 20% of the total target in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.