आरोग्य यंत्रणा ठरली अपयशी
By Admin | Updated: July 10, 2014 00:47 IST2014-07-10T00:02:57+5:302014-07-10T00:47:20+5:30
हिंगोली : राज्य शासनाकडून जनतेच्या आरोग्यासाठी मुबलक निधीची तरतुद करून दिली जात असताना ही प्रक्रिया राबविणारी यंत्रणाच ढेपाळल्याने जनतेला आरोग्याच्या सुविधा समाधानकारक मिळत नसल्याचे
आरोग्य यंत्रणा ठरली अपयशी
हिंगोली : राज्य शासनाकडून जनतेच्या आरोग्यासाठी मुबलक निधीची तरतुद करून दिली जात असताना ही प्रक्रिया राबविणारी यंत्रणाच ढेपाळल्याने जनतेला आरोग्याच्या सुविधा समाधानकारक मिळत नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
आरोग्य हा सर्वसामान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. जनतेचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी विविध योजनांची घोषणा शासनाकडून केली जाते. या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेतले जातात; परंतु या निर्णयाची कितपत अंमजबजावणी होते, याची पडताळणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोट्यावधी रुपयांच्या योजना, त्यासाठी उपलब्ध करून देणारी महागडी यंत्रसामुग्री आणि तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करूनही जनतेला योग्य तो उपचार मिळत नसेल तर संबंधित योजना राबविणाऱ्या यंत्रणेतच दोष असल्याचे स्पष्ट होते.
त्या अनुषंगाने शासनाचे धोरण, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे काम, शासकीय रुग्णालयात मिळणारे उपचार, वैैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद व शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या साहित्याचा योग्य तो वापर या सर्व बाबींचे सर्वेक्षण ‘लोकमत’च्या वतीने जिल्ह्यात करण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे काम समाधानकारक नसल्याचे दिसून आले. आरोग्य सुविधाबाबत शासनाच्या धोरणात बदल करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत नसल्याचे सर्वेक्षणकर्त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
शासकीय रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधा
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राष्ट्रीय कुटुंबकल्याण कार्यक्रम, नियमित लसीकरण, सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना, जिल्हा परिषद स्वनिधीमधून कॅन्सर, किडणी, हृदयरोग आदी दुर्धर रोगाने पिडीत असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत दिली जाते, जननी सुरक्षा योजना, कृष्टरोग नियंत्रण योजना, क्षयरोग नियंत्रण योजना,राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय हत्ती नियंत्रण योजना आदी योजनांची अंमलबजावणी केली जाते. हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात तर सर्जन तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, कान- नाक- घसा तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, अस्थीरोग तज्ज्ञ, भुल तज्ज्ञ आदींची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शिवाय या रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह, अत्याधुनिक शिशु संगोपनगृह, रक्त तपासणी, सीटीस्कॅन आदी सुविधा उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील शासकीय आरोग्य केंद्र
जिल्ह्यात २४ प्राथमिक आरोग्य केंद्र, १३२ उपकेंद्र, कळमनुरी, सेनगाव व औंढा असे तीन ग्रामीण रुग्णालये, वसमत येथील एक उपजिल्हा रुग्णालय (कळमनुरीला मंजूर झाले असले तरी ते कार्यान्वित झालेले नाही), वसमत येथे एक स्त्री रुग्णालय, हिंगोली येथे एक जिल्हा रुग्णालय अशी आरोग्य विभागाची जिल्ह्यात यंत्रणा आहे.
अंमलबजावणी समाधानकारक नाही
हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात महागडी यंत्रसामुग्री उपलब्ध करून देऊनही रूग्णांना समाधानकारक उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी.
शासनाने योजना सुरू केल्या असल्या तरी त्या योजनांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा कुचकामी ठरल्याचे उघड.
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये येणाऱ्या रूग्णांना तात्काळ उपचार मिळेल की, नाही याबाबत साशंकता.
जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या आरोग्याकडे राजकीय पदाधिकाऱ्यांनीही लक्ष देण्याची गरज.