आरोग्य विभागच आजारी
By Admin | Updated: July 23, 2014 00:22 IST2014-07-23T00:05:24+5:302014-07-23T00:22:31+5:30
सुनील चौरे, हदगाव तालुक्यातील २ लाख ६० हजार नागरिकांच्या आरोग्याचे ओझे केवळ १० डॉक्टरांच्या डोक्यावर असल्यामुळे आरोग्य विभाग आजारी झाला आहे.
आरोग्य विभागच आजारी
सुनील चौरे, हदगाव
तालुक्यातील २ लाख ६० हजार नागरिकांच्या आरोग्याचे ओझे केवळ १० डॉक्टरांच्या डोक्यावर असल्यामुळे आरोग्य विभाग आजारी झाला आहे. या विभागालाच उपचाराची गरज असल्याचे चित्र आहे़ ३१ उपकेंद्रातील बाळंतकक्ष नावालाच असून गोरगरीबांना किरकोळ आजारांसाठी खाजगी डॉक्टराची मदत घ्यावी लागत आहे़
तालुक्यात १४५ गावांतील २ लाख ६० हजार लोकांसाठी सहा आरोग्य केंद्र व एक उपजिल्हा रुग्णालय आहे़ या ६ प्राथमिक आरोग्य केंद्रावर २ लाख २१ हजार ग्रामस्थांना आरोग्य सेवा देण्यासाठी ४ डॉक्टर आहेत़ तामसा येथील डॉक्टर निवृत्त झाले असून बरडशेवाळा येथील डॉक्टरचे पद रिक्त आहे़ हदगाव शहरातील उपजिल्हा रुग्णालयात ४० हजार लोकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी ६ डॉक्टर असून रेग्यूलर ५ डॉक्टर आहेत़ त्यापैकी दोन डॉक्टरांची बदली झाली आहे़
या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३१ उपकेंद्र आहेत़ या उपकेंद्रावर निदान दोन कर्मचारी नियुक्त असणे आवश्यक आहे़ यामध्ये पुरूष कर्मचाऱ्यांची १९ पदे भरलेली आहेत़ तर १२ पदे रिक्त आहेत़ स्त्री कर्मचाऱ्यांची कंत्राटी ३१ पदे भरलेली आहेत़ एकूण आरोग्य कर्मचारी १४५ गावांसाठी ६२ आहेत़ प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर एक एमबीबीएस व एक बीएएमएस अशी दोन डॉक्टरांची पदे असतात़ परंतु बरडशेवाळा, आष्टी, तामसा या ठिकाणी ही पदे रिक्त आहेत़
बरडशेवाळा, निमगाव, कोहळी, तामसा, आष्टी, वायफना येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत़ ही केंदे्र व्यवस्थित चालू राहिली तरी ग्रामस्थांना चांगली सेवा मिळू शकते़ परंतु येथे निम्मे पदे रिक्त आहेत़ असलेले डॉक्टर, कर्मचारी स्थानिक केंद्रात राहत नाहीत़ त्यामुळे ग्रामस्थांना नाईलाजास्तव खाजगी डॉक्टरकडे जावून आरोग्य बिघडून घ्यावे लागते़ आर्थिक भूर्दंड वेगळाच़ सहा प्राथमिक केंद्रांतर्गत ३१ उपकेंद्र नावालाच आहेत़ याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही़ पिंपरखेड, कवाना, अंबाळा, गोर्लेगाव, मनाठा, चाभरा, चिंचगव्हाण, निमगाव, आष्टी, लिंगापूर, हरडप, बनचिंचोली, लोहा, घोगरी, पाथरड, चिकाळा, शिरड, निवघा, तळणी, येळंब, भाटेगाव, उमरी, नेवरी, उंचेगाव (बु़), कोहळी इ़ केंद्रे आहेत़ परंतु सर्वत्र परिस्थिती सारखीच आहे़ उपकेंद्रावर बाळंतकक्ष २४ तास सुरू असायला पाहिजे़ ते केवळ ३ ते ४ तास आठवड्यातून ३ ते ४ दिवस सुरू असते़ अडगळीचे केंद्र कायमच बंद असतात़
एवढ्यावरही काम व्यवस्थित व्हावीत ही रुग्णाची अपेक्षा, तीही अपूर्णच़ कारण स्थानिक एकही कर्मचारी राहत नाही़ जिल्ह्यावरून ये-जा करतात़ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा किंवा वर्तमानपत्रात बातमी आली की दोन-चार दिवस हे डॉक्टर नियमित दिसतात़ पुन्हा चंद्राप्रमाणे गायब होतात़ याउलट खाजगी डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आह़े़ एखाद्या अवघड आजाराचा उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर घाबरेल, परंतु ही डॉक्टर मंडळी बेधडक महागडी औषधी देऊन रुग्णांचे बेहाल करतात़ नैसर्गिक आपत्ती, पावसाचा बेजबाबदारपणा या संकटातून तगावलेल्या ग्रामस्थांना या आरोग्य विभागाचाही दणका बसत आहे़
बाळंतकक्षाची सुविधा उपलब्ध नाही
मृत्यूदर घटला हे खरे असले तरी ग्रामीण भागात नवशिशु जन्मताच मृत पावण्याचे प्रमाण गंभीर आहे़ बाळंतकक्षाची व्यवस्था नसल्याने उपचाराअभावी महिन्याकाठी १-२ बालमृत्यू होतच असतो़ त्याची दप्तरी नोंदही नसते़ हे सर्व चुपचाप सुरू असते़ अनेक ठिकाणी पती-पत्नी, वडील-मुलगा किंवा नातेवाईक डॉक्टर आहेत़ त्यापैकी एकच दवाखान्यात उपस्थित असतो़ दुसरा फक्त पगार घेतो़ हदगाव शहरात शालेय तपासणीसाठी ३ डॉक्टर, आयुष डॉक्टर ३ यामध्ये आयुर्वेदिक, युनानी, अॅलोपॅथीक तर नियमित डॉक्टरांची संख्या ५ आहे़ यामध्ये दोन स्पेशालिस्टची बदली होवून त्याऐवजी दोन एमबीबीएस डॉक्टर देण्यात आले़ डॉक्टरांची संख्या वाढण्याऐवजी दिवसेंदिवस कमीच होत आहे़ कर्मचाऱ्यांमध्ये कुशल कर्मचाऱ्यांऐवजी लागेबांधे असलेल्यांची संख्या जास्त असल्यामुळे वरिष्ठांना काम करताना तारेवरची कसरत करावी लागते़