आरोग्य विभाग सरसावला
By Admin | Updated: September 23, 2014 01:36 IST2014-09-23T01:02:46+5:302014-09-23T01:36:53+5:30
पालम : शहरातील १४ वर्षीय मुलीचा डेंग्युमुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आरोग्य विभाग २२ सप्टेंबर रोजी पालम शहरात धूरफवारणी व कोरडा दिवस पाळण्यासाठी सरसावला़

आरोग्य विभाग सरसावला
पालम : शहरातील १४ वर्षीय मुलीचा डेंग्युमुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आरोग्य विभाग २२ सप्टेंबर रोजी पालम शहरात धूरफवारणी व कोरडा दिवस पाळण्यासाठी सरसावला़
पालम येथे सोमवारी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी विविध उपाययोजना राबविण्यात व्यस्त झाले आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोहर ब्याळे यांनी आरोग्य कार्यालयात सकाळच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक घेऊन विविध उपाययोजना करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. आज दिवसभर ताप सर्वेक्षण, पाणी साठ्यांची तपासणी, पाणी साठे रिकामे करणे, पाण्यामध्ये औषधी टाकणे, तापीच्या संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणी आदी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शहरासह ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना स्वच्छता व साफसफाई करण्याच्या सूचना देणारी पत्रे पाठविण्यात आली आहेत. डासांच्या निर्मूलनासाठी व सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या पथकात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ब्याळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश खंदारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश राजूरकर, साथ रोग अधिकारी डॉ. संगीता भंगे, कृष्णा साळवे, शेख लड्डू भाई, गवळे आदींसह कर्मचारी सहभागी झाले आहेत.
डासांचे निर्मूलन करण्यासाठी पाणीसाठे रिकामे करून कोरडा दिवस पाळणे गरजेचे आहे. तसेच घराजवळील खराब झालेले टायर, नादुरुस्त कुलर व प्लास्टिकच्या साहित्याचा नायनाट करावा, झोपताना अंगावर पूर्ण कपडे घालावेत, आजुबाजूच्या परिसरातील घाण साफ करावी, डासांपासून संरक्षण मिळण्यासाठी औषधींचा वापर करावा व कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोहर ब्याळे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश खंदारे यांनी केले आहे.